ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची दीर्घकाळ चाललेली समस्या दूर करण्यासाठी फुणगूस आणि परिसरातील गावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) मोठ्या अपेक्षेने मोबाईल मनोरा उभारला. मनोरा उभा राहिल्यामुळे नागरिकांना अखेर मोबाईल सेवांचा लाभ मिळेल, डिजिटल संपर्क वाढेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; मात्र उभारणीला महिने उलटले तरी मनोरा सुरू न झाल्यामुळे आशेने घेतलेली सिमकार्ड आता कूचकामी ठरत आहेत. या प्रकारामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. फुणगूस तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क अभावी नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागत होते. ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना उंचवट्यांवर चढणे, शेतकऱ्यांना हवामान माहिती मिळवण्यासाठी इतर गावांत धावपळ, व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारात अडथळे, अशी अनेक उदाहरणे आहेत. बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात येत असल्याची बातमी पसरताच नागरिकांनी नव्या आशेने बीएसएनएलची सिमकार्डे घेतली; मात्र आता हीच सिमकार्डे निरुपयोगी ठरत असून, लोकांचा भ्रमनिरास झाला आहे.
याबाबत फुणगूस ग्रामस्थांनी सांगितले की, टॉवर उभारल्यावर वाटले की, आता तरी नेटवर्क मिळेल; पण महिने उलटले तरी सिग्नल येत नाही. सरकारी सेवा देणारी कंपनीच जर वेळेवर सेवा देणार नसेल तर सामान्यांनी कुणाकडे जायचे? ग्रामस्थांनी भारत संचार निगमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मनोरा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असले तरी ठोस कालावधी देण्यात आलेला नाही.
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात – शेतकऱ्यांना सरकारी योजना, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग, नागरिकांना बँकिंग, युपीआय व्यवहार, छोट्या दुकानदारांना डिजिटल पेमेंट या सर्वच गोष्टी नेटवर्कअभावी ठप्प होत असल्याने स्थानिकांची नाराजी वाढत आहे. जर मनोरा तातडीने कार्यान्वित केला गेला नाही तर ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
