वांद्री-आंबवली-देवरूख या अरुंद व डोंगराळ मार्गावर रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देवरूखहून आंबवलीमार्गे वांद्रीकडे येणारा एक ट्रक रात्री वांद्री गावाजवळील अत्यंत अवघड वळणावर अडकून पडला. या घटनेमुळे काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तीव्र वळणे, चढ-उतार आणि कमी रुंदी असतानाही ट्रक व डंपरसारखी जड वाहने या मार्गावरून सर्रास धावत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुदैवाने, ही घटना रात्री घडल्याने मोठी वाहतूककोंडी टळली; मात्र हीच परिस्थिती दिवसा उद्भवली असती, तर संपूर्ण मार्गावर गंभीर अडथळा निर्माण झाला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
देवरूख-आंबवली-कानरकोंड- वांद्रीमार्गे थेट मुंबई-गोवा महामार्ग गाठता येत असल्याने हा मार्ग कमी अंतराचा आणि सोयीचा मानून अनेक अवजड वाहनचालक त्याचा वापर करत आहेत. मोबाईल लोकेशन आणि नकाशांवर आधारित मार्गदर्शनामुळे चालकांना रस्त्याची अरूंदी, तीव्र वळणे आणि धोकादायक चढ-उतार याची माहिती मिळत नाही. परिणामी, अवजड वाहने वारंवार अडकत असून, दुचाकी, चारचाकी आणि स्थानिक वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी, रात्रीच्या वेळेस अवजड वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच योग्य ठिकाणी सूचनाफलक, निर्बंध आणि वाहतूक नियंत्रणाची ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
