कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यामुळे गुरुवारपासून कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. पुढील तीन महिने कोयना प्रकल्पाचे दोन टप्पे बंद राहणार आहेत. त्यामुळे महानिर्मितीच्या कोट्यातील ६०० मेगावॉट वीजनिर्मिती कमी होणार आहे. कोयना धरणातून पोफळी येथील वीजनिर्मिती करणाऱ्या संचाला, पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. या गळतीमुळे सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. ही गळती काढण्यासाठी प्रकल्पाचे दोन टप्पे बंद ठेवावे लागणार आहेत. मागील सहा वर्षांपासून हे काम रेंगाळले होते. अखेर या कामाला सुरुवात झाली आहे. पुणे येथील एका एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. गळती काढण्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाचे दोन टप्पे बंद ठेवावे लागणार आहेत. राज्यात विजेची मागणी सुमारे २५ हजार १८ मेगावॉटपर्यंत आहे. महानिर्मिती कंपनीसह खासगी कंपन्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला वीज पुरवली जाते. कोयनेची ६०० मेगावॉट वीजनिर्मिती बंद झाल्यानंतर सरकारला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
भूमिगत पॉवरहाऊसमध्ये ६०० मेगावॉट निर्मिती – कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती १९६२ मध्ये करण्यात आली. एकूण १९२० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात ७० मेगावॉट क्षमतेचे चार युनिट आहेत. त्यातून २८० मेगावॉट वीजनिर्मिती होते. दुसऱ्या टप्प्यात ८० मेगावॉट क्षमतेचे चार युनिट आहेत. त्यातून ३२० मेगावॉट वीजनिर्मिती होते. प्रत्येकी ४ पेल्टन टर्बाईन असलेल्या एकाच भूमिगत पॉवरहाऊसमध्ये ६०० मेगावॉट वीजनिर्मिती होते. कोयना धरणीच्या जलाशयातून पाणी हेड रेस टनेलब्द्वारे पोफळी येथील पॉवरहाऊसमध्ये येते. येथे वीजनिर्मिती झाल्यानंतर टेल रेस टनेलद्वारे कोळकेवाडी धरणात सोडले जाते.
