शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोट्यवधींच्या नवीन नळपाणी योजनेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मारुती मंदिरसारख्या वर्दळीच्या परिसरात नवीन जलवाहिनीला दोन ठिकाणी मोठी गळती लागल्याने सोमवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, नगरपालिकेपुढे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आव्हान आहे. मारुती मंदिर परिसरातील साक्षी फूडस् आणि महालक्ष्मी मार्ट समोर गेल्या काही दिवसांपासून जमिनीखालून पाण्याचा मोठा विसर्ग होत होता. हे पाणी रस्त्याच्या सखल भागात असलेल्या दुकानांच्या पायऱ्यांशी साचू लागल्याने हा प्रकार व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आला.
सोमवारी सकाळी पालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने या ठिकाणी खोदकाम केले असता मुख्य वाहिनीला गळती असल्याचे स्पष्ट झाले. सकाळपासून सुरू झालेले हे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. पाईपलाईनपर्यंत पोहोचण्यासाठी खोल चर खणण्यात आले होते. या दुरुस्तीदरम्यान जलवाहिनीतील पाण्याचा दाब अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आणि नाल्यात वाहून गेले. सायंकाळपर्यंत दोन्ही ठिकाणची गळती रोखून पुरवठा सुरळीत केला जाईल, असे नगरपालिकेतर्फे सांगण्यात आले.
नव्या योजनेचा ‘जुनाच’ त्रास? – रत्नागिरीकरांना सुरळीत पाणी मिळावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चुन ही नवीन योजना राबवण्यात आली आहे. मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यापासून मुख्य वाहिनी फुटण्याचे सत्र थांबलेले नाही. काही दिवसांपूर्वीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोर वाहिनी फुटल्याने राजिवडा आणि खडपेवठार भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. वारंवार होणाऱ्या या गळतीमुळे पालिकेचा दुरुस्ती खर्च वाढत असून पाण्याचाही अपव्यय होत आहे. या कामाच्या दर्जाची चौकशी करून नगरपालिकेने कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढावा, अशी मागणी रत्नागिरीकरांकडून केली जात आहे.
