पुर आला की, घरात पाणी भरायचे. दरवर्षी हा त्रास ठरलेला. याला पर्याय म्हणून शहरातील खंड येथील प्रमोद वेल्हाळ यांनी घराचे बांधकाम न पाडता १५० जॅकच्या मदतीने ६ फूट उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या घर सव्वादोन फुटांनी उचलण्यात यश आले आहे. महिन्याभरात ते ६ फुटांनी उचलले जाईल. चेन्नईतील खासगी कंपनी हे काम करत असून, जॅकद्वारे घराची उंची वाढवण्याचा हा चिपळूण तालुक्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. मूळचे नरवण येथील असलेले अभियंता प्रमोद वेल्हाळ जलसंपदा विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी चिपळुणातील खंड परिसरात २०१५ मध्ये १३०० स्क्वेअर फूट दुमजली घराचे बांधकाम केले. मुख्य रस्त्यालगत १० गुंठ्यांत त्यांनी प्रशस्त घर बांधले. मात्र, घराच्या चौथऱ्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी भरण्याची समस्या सतावत होती. बांधकाम तोडून पुन्हा उभारणी करणे खर्चिक होते. त्यामुळे राहते घर कशा पद्धतीने उंच करता येईल, यावर त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यांचा एक मुलगा पुण्यात शास्त्रज्ञ असून, दुसरा मुलगा आर्किटेक्ट म्हणून ऑस्ट्रेलियात नोकरीला आहे. अभियंता असलेल्या वेल्हाळ यांना युट्युबवर जॅकद्वारे घराची उंची वाढवता येत असल्याची माहिती मिळाली. पुणे, मुंबई येथे अशा पद्धतीची कामे केली जातात; मात्र चिपळुणात असा प्रयोग कधी झाला नव्हता.
अभ्यासाअंती जॅकच्या सहायाने साह्याने घर उंचीवर नेण्याचा निर्णय वेल्हाळ यांनी घेतला. चेन्नई येथील बीआर डेव्हलपर्स या कंपनीने ७० रुपये स्वेअरफूट दराने हे काम घेतले. पहिल्या घराचे बेड काँक्रिट तोडून खोदाई करण्यात आली. पिलरचा भाग मोकळा झाल्यावर लिंटेलच्या खाली हेवी बिंब टाकण्यात आले. त्यावर जॅक लावून घराचे बांधकाम उचलण्यास सुरुवात केली. महिनाभरापासून हे काम सुरू असून, घर सहा फूट उचलण्यासाठी १५० जॅक लावले आहेत. १५ पिलर उभारले आहेत. जॅक लावण्यासाठी लागणारी सिमेंट वीट ही उंब्रज (ता. कऱ्हाड) येथून आणली. पहिल्या टप्प्यात कामगारांची संख्या जास्त होती; मात्र आता केवळ ५ कामगार नियमित काम करत आहेत.
जॅक वापरण्याचे फायदे – मूळ घराला तडे जात नाहीत. घर कोसळण्याचा धोका नाही. घराचे जॅकच्या साह्याने स्थलांतर. घर अधिक उंचीवर नेता येते. कंपनीकडून कामाची लेखी खात्री…
सखल भागातील घरांना चांगला उपाय – शहरात अनेक भागांतील घरांमध्ये पावसाळ्यात पाणी भरण्याच्या घटना घडतात. नवीन बांधकामाचा खर्च दोन ते अडीच हजार रुपये स्क्वेअर फुटांवर जातो. तुलनेत जॅकच्या साह्याने घराची उंची वाढविण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे
