HomeRajapurऐतिहासिक आंबोळगड ढासळतोय संवर्धनाकडे दुर्लक्ष

ऐतिहासिक आंबोळगड ढासळतोय संवर्धनाकडे दुर्लक्ष

झाडा-झुडपांचाही किल्ल्याला वेढा पडला आहे.

तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाजवळ आणि मुसाकाजी बंदराच्या परिसरात आंबोळगड येथे बांधण्यात आलेल्या किल्ले आंबोळगड ऐतिहासिक पराक्रमाची आजही साक्ष देत आहे. आंबोळगड येथे एसटी थांब्याच्या येथे एका उंच भागावर असलेल्या किल्ल्याचे जुने बांधकाम, पाण्याच्या टाकी, बुरजाचे अवशेष, तटबंदी अन् त्या ठिकाणी असलेली तोफ इतिहासाची साक्ष देतात. समुद्रसपाटीपासून काही मीटर अंतरावर बांधलेला किल्ला आंबोळगडची तटबंदी पूर्ण ढासळली आहे. झाडा-झुडपांचाही किल्ल्याला वेढा पडला आहे. या किल्ल्याचे बांधकाम नेमके बत कोणी केले आणि कधी झाले याबाबत ठोस माहिती सद्यःस्थितीमध्ये उपलब्ध नाही. सुमारे १२०० चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेल्या या किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र आहे. किल्ल्याच्या उत्तर आणि पश्चिमेस खंदक खोदलेले असून ते बुजलेल्या स्थितीत आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळली असली तरी, एकमेकांवर चिरे रचून सुमारे १० ते १५ फूट उंचीची तटबंदी उभारल्याचा बांधकामावरून अंदाज येतो.

किल्ल्याच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडामध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूला एक बुरुज, तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भिंत आहे. त्यापुढे असलेला बुरुज पूर्णपणे ढासळला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शत्रूने थेट मारा करता येऊ नये, म्हणून अशी त्याठिकाणी बांधकामाची रचना दिसते. किल्ल्यामध्ये शिरल्यानंतर, मध्यभागी एक मोठे वडाचे झाड असून, त्याचा विस्तार किल्ल्यात दिसून येतो. या झाडासमोर एक तुटलेली तोफ असून झाडामागे आयताकृती विहीर आहे. विहिरीच्या समोर आणि बाजूला दगडी पाण्याचे पात्र असून विहिरीच्या उजव्या बाजूला उद्ध्वस्त वास्तू दिसते. या किल्ल्याच्या परिसरामध्ये स्वयंभू श्री गणेश मंदिर, जागृत श्री महापुरुष देवस्थान, स्वयंभू श्री जटेश्वर देवस्थान आहे.

घेरा यशवंतगडाचे संवर्धन, आंबोळगडाकडे दुर्लक्ष – आंबोळगडपासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावरील नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याचे शासनातर्फे जतन आणि संवर्धन केले जात आहे. हे करत असताना आंबोळगडच्या जतन आणि संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. या किल्ल्याच्या पाऊलखुणा कायम राहण्यासाठी याचेही जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments