कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने 48 तासांसाठी दारूविक्रीवर बंदी घातली आहे. एका व्हायरल ऑडिओला विरोध झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. खरंतर, कर्नाटकात मद्यविक्रीवर 48 तासांची बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण कन्नडचे (डीके) उपायुक्त मुल्लाई मुहिलन यांनी आज सोमवारी (16 सप्टेंबर) ही माहिती दिली. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल नगरपरिषदेच्या हद्दीत सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर 48 तासांची बंदी घालण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुल्लाई मुहिलन म्हणाले की, “हिंदू संघटनांनी परिसरात तणाव पसरवणाऱ्या एका कथित व्हायरल ऑडिओला विरोध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही बंदी तात्काळ लागू झाली आहे आणि पुढील 48 तास लागू राहील. परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी लागू झाल्यानंतर बंटवाल नगरपरिषदेच्या हद्दीतील दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत.”
हैदराबादमध्येही दारूबंदी
हैदराबाद शहर पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी सामाजिक सुरक्षेसाठी शहरातील मद्यविक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. पोलिस आयुक्त सी.व्ही. आनंद यांच्या आदेशानुसार ही बंदी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. हैदराबाद आणि सिकंदराबाद या दोन्ही ठिकाणी दारूची दुकाने, ताडीची दुकाने आणि बारवर ही बंदी लागू असेल.
गणपती विसर्जनामुळे घेतलेला निर्णय
SHO आणि अतिरिक्त निरीक्षकांसह स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणपती विसर्जन दरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलेल आहे.