कोकण व कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने संयुक्तपणे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांद्वारे व्हिडिओ निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे. बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे अचूकपणे लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन करणारे व्हिडिओची ही स्पर्धा असणार आहे. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमांतर्गत ही स्पर्धा होणार आहे. मागील वर्षी कोल्हापूर मंडळाने मागील वर्षी कोल्हापूर मंडळाने तयार केलेले व्हिडिओ राज्य मंडळाने स्वीकारले. आता रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यांतील शिक्षकांना भाग घेता येणार आहे. माध्यमिक शाळांचे किंवा मुख्याध्यापक त्यांचे विषय शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा त्यांचे विषय शिक्षक यांच्यासाठी ही स्पर्धा खुली आहे.
शिक्षकांनी व्हिडिओ निर्मिती स्वतः करणे आवश्यक आहे; मात्र तांत्रिक बाबींसाठी ते सहाय्यकाची मदत घेऊ शकतात. विशेषतः, नोंदणी अर्जामध्ये संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची किंवा मुख्याध्यापकांची शिफारस असणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क नाही. या संबंधीच्या सूचना कोकण बोर्डाच्या सचिव पुनीता गुरव यांनी जारी केल्या. उत्कृष्ट व्हिडिओच्या निवडीसाठी आशय किंवा मजकूर (५० गुण), तंत्रज्ञानाचा वापर (२० गुण), सादरीकरण कौशल्य (२० गुण) आणि एकंदरीत प्रभाव (१० गुण) यांचा समावेश आहे. गुणवंत शिक्षकांना मंडळामार्फत प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. हे व्हिडिओ जानेवारीत मंडळाच्या संकेतस्थळावरून व युट्यूबवरून प्रसारित केले जाणार आहेत.
गुणांकन निकषांचा समावेश – इ.१०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक व्हिडिओ तयार करायचे आहेत. स्पर्धकांनी आपला व्हिडिओ २६ डिसेंबरपर्यंत स्वतःच्या सोशल मीडियावर अपलोड करणे बंधनकारक आहे. व्हिडिओ ७ते १० मिनिटांचा असावा. त्यात विषयाचा आशय, विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन, विषयाची भीती कमी करणे, उत्तरपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी, प्रश्ननिहाय भारांश, उत्तरलेखन पद्धती, गुणांकन निकष आणि वेळेचे नियोजन या बाबींचा समावेश असावा.
