विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यवधीचा खर्च, लसीकरण मोहीम आणि विशेष उपक्रम राबवूनही महाराष्ट्रात ४३ महिन्यांत नवजात बालकांचे मृत्यू होत आहेत. १ ते ५ वर्षांच्या मुलांतील मृत्यूदरात १.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रत्नागिरीत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अल्प आहे, मात्र गेल्या आठ महिन्यांत ० ते ५ वयोगटातील ८९ बालकं मृत पावली आहेत. अकाल जन्म, कमी वजन, श्वसन समस्या, संसर्गजन्य रोग, जन्मजात दोष किंवी विकृती, कुपोषण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची अपुरी काळजी ही कारणे बालमृत्यूला कारणीभूत आहेत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ८९ बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत.
एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयासह, अन्य शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालये यामध्ये ७ हजार ५०० प्रसूती झाल्या. आरोग्य विभागाकडून माता-मृत्यू, नवजात बालमृत्यू रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले आहेत. मातेला प्रसूतीपूर्व आणि प्रसूतिपश्चात योग्य प्रकारची वैद्यकीय सेवा आणि सुविधा दिल्या जातात. त्यामुळे माता मृत्यू रोखण्यात या विभागाला यश आले आहे. आठ महिन्यांत विविध कारणांनी दोन मातांचा मृत्यू झाला आहे.
अकाली बाल मृत्यूची कारणे… – अकाली जन्मलेल्या बाळाला जगविणे अवघड असते. जन्मापासून असलेले शारीरिक दोष किंवा विकृती. अतिसार, मलेरिया आणि इतर संसर्ग. न्यूमोनिया आणि जन्मावेळी श्वास गुदमरणे अशा श्वसनाच्या समस्या. अपुऱ्या पोषणामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होणे अशा कारणे अकाल बालमृत्यूची आहेत.
