HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार ‘लाडक्या बहिणी’ अपात्र

सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरपडताळणी सुरू करण्यात आली.

लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. लाडक्या बहिणींना गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचा फायदा महायुतीला मिळाला. महिलांच्या बंपर व्होटिंगमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले; मात्र सत्तेवर येताच या योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी किंवा छाननी करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी अर्ज केले त्यांची कोणतीही पडताळणी न करता त्यांना लाभ देण्यास सुरुवात झाली. पुन्हा सत्ता मिळताच या योजनेचा मोठा ताण सरकारच्या तिजोरीवर पडत असल्याने लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरपडताळणी सुरू करण्यात आली. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या, ज्या प्रत्यक्षात अपात्र ठरतात; परंतु लाभ घेत आहेत अशा बहिणींची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. काही जिल्ह्यामध्ये तर चक्क पुरुषांनीच या योजनेचा लाभ घेतल्याचे पुढे आले. त्यांच्याकडून आता दिलेल्या पैशाची वसुली करण्यात येणार असून, फसवणुकीबद्दल रीतसर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता तब्बल ४७ हजार नावे कमी झाली आहेत. त्यांनी या योजनेचा चुकीची माहिती देऊन गैरफायदा घेतल्याचे पुढे आले आहे. ज्यांच्याकडे चारचाकी, सरकारी नोकरी किंवा वयोमर्यादा ओलांडली आहे, प्राप्तिकर भरला आहे अशा बहिणींची नावे आता यादीतून वगळण्यात आली आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यातून जवळपास ४ लाख २० हजार ४४० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. चौकशी आणि छाननीनंतर त्यातील ४६ हजार ९६३ लाभार्थी निकषात बसत नसल्याने कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, ५३ बहिणींनी छाननीनंतर स्वतःहून या योजनेचा लाभ आपल्याला नको, असे कळवले आहे. आता केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने आणखी काही नावे रद्द होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या योजनेच्या ३ लाख ७७हजार ४७७ महिला लाभार्थी आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments