HomeRatnagiriपशुधनाच्या 'इअरटॅगिंग'मध्ये नेटवर्कअभावी अडथळे...

पशुधनाच्या ‘इअरटॅगिंग’मध्ये नेटवर्कअभावी अडथळे…

त्या जनावराची सविस्तर माहिती नोंद केलेली असते.

गेल्या काही महिन्यांपासून मोकाट गुरांचा प्रश्न साऱ्यांना चांगलाच सतावत आहे. त्यामुळे मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जनावरांचे ‘इअरटॅगिंग’ करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला पशुधनाच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल युनिक आयडीचे (इअरटॅगिंग) महत्त्व अनन्यसाधारण असून, शासनाने अनिवार्य केले आहे; मात्र, युनिक आयडीसंबंधी पुरेशी माहिती नसल्याने इअरटॅगिंगसाठी शेतकऱ्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. जनावरांची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी आवश्यक इंटरनेट नेटवर्कचा अनेक गावांमध्ये अभाव दिसत आहे. यासह अन्य कारणांमुळे केवळ जनावरांची ओळख पटवण्यासाठी नव्हे, तर आधुनिक पशुधन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग बनलेले ‘इअरटॅगिंग’ करणे आव्हानात्मक बनले आहे.

असा असतो युनिक आयडी – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय डिजिटल पशुधन मिशन या अभियानांतर्गत सर्व जनावरांना डिजिटल ओळख दिली जाते. त्यामध्ये प्रत्येक जनावराला बाराअंकी बारकोड असलेला ‘युनिक टॅग पशू आधार’ म्हणजे विशिष्ट ओळख क्रमांक असलेला टॅग मिळतो. त्यानुसार, ‘भारत पशुधन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विशिष्ट ओळख क्रमांकानुसार त्या जनावरांची नोंदणी होऊन त्या जनावरांचे लसीकरण, पैदास, दूध उत्पादन आणि मालकी हक्कातील बदल यासारखी सविस्तर माहिती नोंदवली जाते. एकंदरीत, त्या बारकोड असलेल्या युनिक आयडी क्रमांकावरून त्या जनावरांची सविस्तर माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

युनिक आयडीचे फायदे – युनिक आयडी क्रमांकामुळे संबंधित जनावराची एकत्रितरीत्या सविस्तर माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना रोग नियंत्रण आणि पशुधन व्यवस्थापन करणे अधिक सोयीचे झाले आहे. त्याचवेळी जनावराचा मालक कोण आणि कुठल्या गावातील आहे याचीही माहिती सहजपणे उपलब्ध होण्यास मदत होते. टॅग नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक करता येणार नसल्याने जनावरांच्या अवैध वाहतुकीला आळा बसविणे सुलभ झाले आहे. दुसऱ्या बाजूला ‘इअरटॅगिंग’ नसलेल्या जनावरांना शासनाच्या कोणत्याही सेवांचा लाभ शेतकऱ्याला घेता येणार नाही. ‘इअरटॅगिंग’ मुळे राज्य अन् देशभरातील जनावरांची एकत्रित संख्या अन् सविस्तर माहिती मिळत असल्याने शासनाने जनावरांसंबंधी एखादी शासकीय योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अधिक सोयीचे झाले आहे. जनावरांच्या युनिक आयडीचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जनावरांसाठी ‘इअरटॅगिंग’ अनिवार्य केले आहे.

मोकाट गुरांची ओळख पटवणे सोपे – शेतकऱ्यांचे प्रबोधन करून मोकाट गुरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना पायबंद घालणे शक्य आहे. त्याचवेळी अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करणेही शक्य आहे; मात्र, एखाद्या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट गुरांची ओळख पटणे महत्त्वाचे असते. त्यासाठी गुरांचे ‘इअरटॅगिंग’ करणे गरजेचे आहे. अनेकवेळा अपघातामध्ये जीव गमावलेल्या वा अपघातास कारणीभूत ठरलेल्या जनावरांच्या कानामध्ये टॅगिंग केलेले नसल्याने त्या जनावराची ओळख पटवणे जिकिरीचे जाते. त्यामुळे राजापुरातील विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांसमवेत प्रशासनाच्या झालेल्या बैठकीमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला जनावरांची इअरटॅगिंग’ करण्याची सूचना केली होती. त्याचवेळी जनावरांच्या ‘इअरटॅगिंगला’ पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांनाही आवाहन करण्यात आले होते.

इंटरनेट नेटवर्कमुळे समस्या – ‘इअरटॅगिंग’ करत असताना संबंधित जनावराची सर्व माहिती ऑनलाईन भरावी लागते. ती माहिती परिपूर्ण भरण्यासह ऑनलाईन सेव्ह होण्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर येणारा ‘ओटीपी’ महत्त्वाचा असतो; मात्र, अनेक गावे-वाडीवस्तीवर मोबाईल रेंज आणि इंटरनेट नेटवर्कचा अभाव आहे. त्यातून, वेळेमध्ये मोबाईल ‘ओटीपी’ मिळत नसल्याने इअरटॅगिंग करण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येते. अनेक शेतकरी सकाळी लवकर गुरे चरण्यासाठी सड्यावर घेऊन जातात आणि सायंकाळी घरी आणतात. विखुरलेली गावे आणि वाड्यावस्तीचा विचार करता या वेळेचा समन्वय साधताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. काहीवेळा गैरसमजातून शेतकरी जनावरांच्या ‘इअरटॅगिंगला’ अपेक्षित असलेला सकारात्मक प्रतिसादही देताना दिसत नसल्याचेही प्रशासनाकडून सांगितले जाते.

माहिती अपडेट करण्याकडे दुर्लक्ष – जनावराला ‘इअरटॅगिंग’ मुळे बाराअंकी बारकोड असलेला ‘युनिक टॅग (पशू आधार)’ म्हणजे विशिष्ट ओळख क्रमांक असलेला टॅग मिळतो. त्यावर, त्या जनावराची सविस्तर माहिती नोंद केलेली असते. शेतीकामांसाठी असो वा दुग्ध व्यवसायाच्या अनुषंगाने एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला जनावरांची विक्री करतो. त्यावेळी ती माहिती ‘युनिक टॅग (पशु आधार)’ क्रमांकावर लगतच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी वा कार्यालयाशी संपर्क साधून अपडेट करणे गरजेचे असते; मात्र, त्याकडे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मूळ मालकाकडून त्या जनावराच्या झालेल्या विक्रीनंतर ते जनावर अन्य ठिकाणी विक्री झाल्यास सद्यःस्थितीतील जनावराच्या मालकाचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments