HomeRatnagiriलांजा शहरात आ. किरण सामंताचे वर्चस्व सिद्ध उबाठासह काँग्रेसचा पराजय

लांजा शहरात आ. किरण सामंताचे वर्चस्व सिद्ध उबाठासह काँग्रेसचा पराजय

एकेकाळी देशाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही.

गेले अनेक दिवस चर्चेत राहिलेल्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने नगराध्यक्ष पदासह १० जागांवर मिळविलेल्या घवघवीत यशानंतर आमदार किरण सामंत यांची पक्ष संघटनेवर असलेली कमांड पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आपणच निवडणुकीतील किंगमेकर असल्याचे दाखवून दिले आहे. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेस यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. उमेदवारी नाकारलेल्या वंदना काटगाळकर, मंगेश लांजेकर व रफिक नेवरेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळविलेला विजय हा सर्वच राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. तसेच सुशीला कांबळे या नवख्या उमेदवाराने मिळविलेला विजय हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ‘जिवंत’ ठेवणारा ठरला आहे. लांजा नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुती, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे -राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आणि अपक्ष यांचे लांजा कुवे संघटक यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या तिघांकडूनही विजयाचे दावे केले जात होते. आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही निवडणूक लढविली गेली. साहजिकच महायुतीकडून नगराध्यक्ष पदासह नगरपंचायतीवर पूर्ण बहुमताने सत्ता आणली जाणार असा ठाम दावा करण्यात आला होता.

आमदार किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेवून कोणत्याही परिस्थितीत नगरपंचायतीवर बहुमत आणणार असा दावा केला होता. तर महाविकास आघाडीच्या पूर्वा मुळे यांनीही सुरुवातीपासूनच प्रचारात जोरदार आघाडी घेत निवडणुकीत मोठी रंगत आणली होती. लांजा कुवे संघटनच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांच्या पत्नी प्रियांका यादव यांनीही सूत्रबद्ध प्रचार, आणि यंत्रणा राबवित विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे केले होते.  या निवडणूक निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीत अपक्षांने मारलेली बाजी होय. या निवडणुकीत एकूण ६ नगरसेवक पदावर अपक्षांनी मारलेली बाजी ही सर्वच राजकीय पक्षांना विचार करायला लावणारी आहे. आमदार किरण सामंत यांनी उमेदवारी नाकारलेले मिलिंद लांजेकर यांनी प्रभाग क्रमांक ८, रफिक नेवरेकर यांनी प्रभाग क्रमांक ९ आणि वंदना काटगाळकर यांनी प्रभाग क्रमांक १२ मध्ये मारलेली बाजी निश्चितच दखल घेण्याजोगी ठरली. आपल्याला पक्षाने उमेदवारी नाकारली तरी आपल्या प्रभागात आपणच किंग असल्याचे या तीनही अपक्ष उमेदवारांनी सिद्ध केले आहे.

या निवडणुकीने खऱ्या अर्थाने धक्का दिला आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या पक्षाची नगरपंचायतीवरील सत्ता संपुष्टात आली आहे. सुशीला कांबळे या प्रभाग क्रमांक ४ मधील नवख्या उमेदवाराने विजय मिळवित पक्षाची लाज राखली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा पातळीवरील नेते तालुक्यातील असताना देखील या प्रचारात त्यांचा फारसा सक्रिय सहभाग दिसून आला नाही. पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी देखील पक्षाला विजयासाठी म्हणावी तशी रसद वा ताकद पुरविली नाही. किंबहुना ते ही ताकद देण्यात अपयशी ठरले आहेत. एकेकाळी देशाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाला केवळ एकमेव जागा सोडण्यात आली होती. मागील निवडणुकीत भाजपाचे तीन नगरसेवक असताना यावेळी मात्र भाजपाला केवळ एकमेव जागा सोडण्यात आली होती. भाजपाने ही जागा जिंकली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments