राजापूर तालुक्यात पुन्हा एकदा दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी रात्री एकाच वेळी चार दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वैभव देवू करंबे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवणे बुद्रुक येथील वैभव करबे यांनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी आपली दुचाकी (एमएच ०८ एएच ५४६४) ही घरापासून काही अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरील शेडमध्ये लावलेली होती. शनिवार २० डिसेंबर रोजी करंबे हे सकाळी ७.३० हायस्कूलमध्ये पुन्हा कामावर येण्याकरिता गाडीजवळ गेले असता त्यांना त्यांची गाडी मिळून आली नाही. त्यामुळे करंबे यांनी आजूबाजूस शोध घेऊन इतरत्र चोकशी केली असता करंबे यांच्या मोटारसायकल प्रमाणे गावातील सुतारवाडी येथील सतीश पांचाळ याची दुचाकी (क्र. एमएच ०८ एव्ही ०९३५) तसेच वडदहसोळ बौद्धवाडी येथील अविनाश गोविंद जाधव याची दुचाकी (एमएच ०४ सीआर ४९८७) त्याचप्रमाणे कोंडदसूर बांधवाडी येथून एक दुचाकी अशा अन्य तीन दुचाकी चोरीला गेल्याचे समजले, तसेच दसुर येथील कालसेकर यांचा एक मोबाईलही चोरीला गेल्याची माहिती समोर आली. चोरट्यांनी चार दुचाकी आणि एक मोबाईल असा सुमारे ६४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.
