सणासुदीच्या काळामध्ये बाहेरगावी असणारे लोक आपापल्या घरी परततात. परंतु ऐन सणाच्या धामधुमीत सुरु केलेल्या विशेष रेलवे गाड्या अचानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोरोना काळात रेल्वे सेवा पूर्ण बंद असल्याने कालांतराने कोरोन चा प्रभाव कमी झाल्यावर काही मार्गावर रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या. परंतु, रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने व्यवसाय कमी प्रमाणात होत असल्याचे कारण दाखवत दक्षिण मध्य रेल्वेने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ४ विशेष रेल्वे ऐन दिवाळी सणातच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील सहा-सात महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा येणाऱ्या सणाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विशेष रेल्वे सुरू केली होती. त्याचप्रमाणे विशेष रेल्वे गाडी सुरू करताना रेल्वे विभागाने प्रवाशांना आरक्षण करणे सक्तीचे केले होते. त्यामुळे सर्वच गाड्यांना आता आरक्षणाशिवाय प्रवास करणे शक्य नसल्याने प्रवाशांनीही सणाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण करीत प्रवास करणे पसंत केले. परंतु रेल्वे विभागाने काही ठराविक विशेष रेल्वेही सुरू केल्या.
ज्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड – पनवेल – नांदेड, धर्माबाद नांदेड धर्माबाद, काचिगुडा नरखेड काचिगुडा, काचिगुडा अकोला काचिगुडा या रेल्वे २३ ते २८ ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू केल्या. ज्यात नांदेड पनवेल नांदेड ही २३ व २४ ऑ्क्टोबरला सुरू केली होती. ती ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रेल्वे नांदेड येथून २३ व पनवेल येथून २४ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्याच बरोबर कोल्हापूर-तिरुपती- कोल्हापूर ही रेल्वे गाडी २८ व ३० ऑक्टोबरपासून सुरू केल्या होत्या. मात्र, तिरूपतीहून गुरुवार १२ नोव्हेंबर ला तर कोल्हापूर येथून धावणारी १४ नोव्हेंबरची शेवटची धावणारी गाडी असेल असे म्हटले आहे. धर्माबाद मनमाड धर्माबाद ही रेल्वे २४ ऑक्टोबर रोजी सुरू करून ती ३० नोव्हेंबरपर्यंत धावेल असे म्हटले होते. परंतु, रविवार १५ नोव्हेंबर ऐन दिवाळीमध्येच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सण समोर ठेवून सुरू केलेली ही दिवाळीच्या दिवशीच बंद करण्यात येणार आहे. शिवाय या सर्व रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आरक्षनाशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने आधीच स्पष्ट केले. पण या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे सांगून सर्व रेल्वे जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐन दिवाळीत अचानक रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांमध्ये संतापासकट नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.