आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदाही गर्दी न करता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं अस आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरवर्षी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकरांचे अनुयायीची गर्दी होत असते. यंदा मात्र अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरातच राहून जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा चैत्यभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी 10.55 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही महामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर जातील. चैत्यभूमी येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळावरुन आंबेडकर जयंतीच्या दिवशी थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था बजावण्यात आली आहे. तसंच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांचं सोशल मीडियाद्वारे प्रक्षेपण केल जाणार आहे.
मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केलं जाईल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साधून महाराष्ट्र काँग्रेसने रक्तदान करुन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेसतर्फे चेंबूरमध्ये राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पडणार आहे. त्यानंतर देशातील आणि राज्यातील काँग्रेस नेते व्हर्च्युअल अभिवादन सभा घेणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण समाज माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चांदवड इथले कला शिक्षक देव हिरे यांनी आगळीवेगळी आजपर्यंत कुठेही न साकारलेली अशी बाजरीच्या भाकरीवर रांगोळी साकारली आहे. बाबासाहेबांनी मनुष्य म्हणून नाकारल्या गेलेल्या उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहासोबत आणण्याचं कार्य केलं. “आपु खाते त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे” या प्रसिध्द गीताचे शब्द बाबासाहेबां प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. आजपर्यंत अशी कलाकृती कोणी साकारलेली नाही. कला शिक्षक देव हिरे यांनी ही आगळी-वेगळी कलाकृती साकारत महामानवाला अनोखं अभिवादन केलं आहे. मागील वर्षी त्यांनी पाण्यात बाबासाहेबांची रांगोळी साकारली होती.