भाजप कार्यकत्यांत हमरीतुमरी बैठक गुंडाळली

सेना-भाजप युतीमध्ये रत्नागिरी तालुक्यात एकही जागा जिल्हा परिषदेत वाट्याला आली नाही.

Must read

शिवसेनेने पंचायत समितीमध्ये फक्त दोन गण सोडत भाजपची बोळवण केली आहे. जिल्हा परिषदेसाठी एकही जागा न सोडल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकारी हमरीतुमरीवर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना बैठक गुंडाळावी लागली. त्यामुळे भाजप रत्नागिरीत बंडखोरीचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (ता. २१) शेवटचा दिवस आहे. शिवसेनेने जिल्ह्यात भाजपसोबत युती करत भाजपला सात तर पंचायत समितीमध्ये १९ जागा सोडल्या आहेत; मात्र रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही. पंचायत समितीमध्ये भाजपला दोन गण सोडण्यात आले आहेत. काही वर्षापर्यंत तालुक्यात काही गट व गण हे भाजपचे बलस्थान होते. गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप स्वबळावर लढली होती. त्या वेळी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता; मात्र मागील काही वर्षात राज्यात सत्ता आल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यात लक्ष केंद्रित केले. त्यामुळे भाजपला चांगले दिवस येऊ लागले आहेत. कोट्यवधी रुपयांची विकासकामेही रत्नागिरी जिल्ह्यासह तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही वाढला आहे; मात्र सेना-भाजप युतीमध्ये रत्नागिरी तालुक्यात एकही जागा जिल्हा परिषदेत वाट्याला आली नाही.

त्यातच पंचायत समितीमध्येही सेनेने दोन जागांवरच बोळवण केल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांची तयार झाली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काल भाजप दक्षिण जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निवडणूक प्रभारी अॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कुवारबावसह पावस पंचक्रोशी, कोतवडे परिसरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्यात दोनच पंचायत समितीच्या जागा मिळाल्यावरून जोरदार वाद झाला. या वेळी कुवारबाव भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामेही दिले. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अगदी हमरीतुमरीपर्यंत स्थानिक कार्यकर्ते आले होते. पदाधिकाऱ्यांवर नाना आरोपही या वेळी करण्यात आले. कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून ही सभा गुंडाळण्यात आली.

बंडखोरीबाबत आज होणार चित्र स्पष्ट – महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. त्यामुळे गेली अनेकवर्षे तयारी करूनही पक्षाचे तिकीट न मिळालेला भाजपचे नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी बंडखोरी करण्याची शक्यता आहे. भाजप पदाधिकारी कोणत्या भागातून बंडखोरी केली, हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article