मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती आली असून, आतापर्यंत ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२६ पूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. हे उद्दिष्ठ वेळेत पूर्ण होणार का ? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. सुमारे १२० स्लॅब पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. एकीकडे गर्डर चढविण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे जोडरस्त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते. त्यामधील अंतर कमी करून ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तिथे अतिरिक्त पिअर उभारण्यात आले आहेत. नवीन रचनेनुसार, सर्व पिअर व पिअरकॅपचे काम पूर्ण केले आहे. आता त्यावर उर्वरित गर्डर चढविण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. पिअरकॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन कार्यरत आहेत. त्यामुळे आता मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंता शाम खुणेकर यांनी दिली. उड्डाणपुलासाठी टप्प्याटप्प्याने १८२ स्लॅब टाकावे लागणार आहेत. त्यापैकी ६२ स्लॅबचे काम पूर्णत्वास गेले असून, उर्वरित स्लॅबचे काम दोन महिन्यांतच पूर्ण केले जाणार आहे.
भुयारी मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष – पाग पॉवर हाऊस येथे असलेल्या चौकातून अजूनही ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात झाले असून, त्यात काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. सततच्या अपघातांच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी होत आहे;
स्टॉलधारकांच्या अतिक्रमणाने अडचण – चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच काही ठिकाणी मोक्याच्या जागा पाहून तेथे हातगाडी व अन्य स्टॉलधारकांनी आतापासूनच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पुलाच्या कामात अडथळे येऊ लागले आहेत, शिवाय या स्टॉलवर गर्दी होत असल्याने तेथे एखादा अपघात झाल्यास ते धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
