चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील विस्कळीतपणा उघड झाला होता. परिणामी, निवडणुकीत पराभवास सामोरे गेल्यानंतरही महाविकास आघाडीने त्यातून काहीच बोध घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व ठाकरेसेनेमध्ये समन्वय नसल्याने महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाली. तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटापैकी ३ तर पंचायत समितीच्या १८ पैकी ७ जागा युतीत भाजपच्या वाट्याला आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकला चलोची भूमिका घेत सर्व जागांवर उमेदवार दिले. दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र विस्कळीत झाली. तालुक्यात पक्षाची मजबूत ताकद नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाचे नेते माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने लढणारे कार्यकर्तेच द्विधा मनःस्थितीत अडकले. तुतारीच्या चिन्हावर केवळ एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला. रामपूर गटातील शरद पवार गटाचे उमेदवार घडाळ्याच्या चिन्हावर लढणार आहेत.
काँग्रेसनेही मोजक्याच जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे सेनेत सुरुवातीला नेतृत्व कोणी करायचे यावर खल झाला. शेवटी माजी खासदार विनायक राऊत यांनीच पुढाकार घेतला. राऊत हे पालिका निवडणुकीत केवळ एकदाच चिपळूणला आले. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीही आतापर्यंत एकदाच चिपळूण दौऱ्यावर येऊन गेले आहेत. पक्षांतील नेत्यांच्या विसंवादामुळेच उबाठाचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. उबाठाकडून बहुतांश जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पालिका निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीसाठी संयुक्त बैठका झाल्या; मात्र त्यातून त्वरित ठोस निर्णय झाले नाहीत. परिणामी, आघाडी दिशाहीन झाल्याचे दिसून आले.
