HomeRatnagiriसागरी किल्ले जैवविविधतेचे आश्रयस्थान 'आसमंत'चे सर्वेक्षण

सागरी किल्ले जैवविविधतेचे आश्रयस्थान ‘आसमंत’चे सर्वेक्षण

ताऱ्यांसह (स्टारफिश) व सी ॲनेमोनसारख्या सागरी जीवांची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक सागरी किल्ले केवळ पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक नसून, ते जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा, हिवाळ्यात केलेल्या जैवविविधता सर्वेक्षणाच्या अहवालातून कोकणातील सागरी किल्ल्यांवर समृद्ध व संवेदनशील जैवसंपदा नांदत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्यातून आसमंत सागर महोत्सवाच्या (सीव्हर्स) पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. चौथ्या सागर महोत्सवात या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालाच्या अभ्यासातून अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. आसमंतचे संस्थापक, संचालक नंदकुमार पटवर्धन यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हेमंत कारखानीस आणि शांभवी चव्हाण यांनी सर्वेक्षणाचे काम केले. पावसाळा व हिवाळ्यात अभ्यास केला. काही किल्ल्यांवर पर्यटक येतात म्हणून सरपटणाऱ्या प्राण्यांना मारण्याचे प्रकार घडतात, असे निरीक्षण नोंदवण्यात आले.

या अभ्यासात मुरूड-जंजीरा, कुलाबा (अलिबाग), खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग (रायगड जिल्हा) तसेच अर्नाळा (पालघर) या सहा सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवरील खडकाळ बेटे, भरती-ओहोटी क्षेत्रे, किल्ल्यांच्या भिंती, बुरुज, पडके बांधकाम आणि मोकळ्या जागांमुळे येथे विविध सूक्ष्म अधिवास निर्माण झाले असून, त्यामुळे अनेक जीवप्रजाती टिकून आहेत. अहवालानुसार, या किल्ल्यांवर कीटक, फुलपाखरे, खेकडे, शिंपले, कीटक, फुलपा गोगलगायींसारखे अपृष्ठवंशी जीव सर्वाधिक संख्येने आढळतात, तर त्यानंतर पक्षीप्रजातींची संख्या लक्षणीय आहे. किल्ल्यांचे समुद्राकडे तोंड असलेले बुरुज, मोकळी प्रांगणे व शांत परिसर हे स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांसाठी महत्त्वाचे थांबे ठरत आहेत. अहवालात अनियंत्रित पर्यटन, कचरा, प्लास्टिक प्रदूषण, प्रकाशयोजना आणि मानवी हस्तक्षेपामुळे किल्ल्यांवरील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे किल्ले संवर्धन करताना जैवविविधतेचा विचार, पर्यावरणपूरक पर्यटन, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि नियमित निरीक्षण यांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.

कासव, स्टारफिशची नोंद – विशेष म्हणजे, अर्नाळा किल्ल्यावर आढळलेली ‘इंडियन फ्लॅपशेल टर्टल’ ही कासवाची प्रजाती आंतरराष्ट्रीयस्तरावर ‘धोक्यात’ म्हणून नोंदवलेली आहे, तर मुरुड जंजीरा किल्ल्याच्या परिसरात समुद्री ताऱ्यांसह (स्टारफिश) व सी ॲनेमोनसारख्या सागरी जीवांची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद किल्ल्यांच्या आसपासच्या सागरी परिसंस्थेचे आरोग्य दर्शवते.

शेवाळ वैशिष्ट्यपूर्ण – किल्ल्यांवर उगवणाऱ्या औषधी व क्षारसहिष्णू वनस्पती, पावसाळ्यात बहरणारी हिरवळ आणि खडकांवर वाढणारे शेवाळ हे या जैवविविधतेचे वैशिष्ट्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात जैविक हालचाली वाढतात, तर पावसानंतरचा काळ पक्षी व सागरी जीव निरीक्षणासाठी अधिक अनुकूल ठरतो.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments