स्वयंभू श्री देव मार्लेश्वराची वार्षिक यात्रा काल (ता. १६) मारळ येथे उत्साहात झाली. पंचक्रोशीतील नागरिकांसह तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेला हजेरी लावली. मार्लेश्वर, गिरिजादेवी व वाडेश्वर या तिन्ही पालख्यांचे मारळ नगरीत आगमन होताच यात्रेला आलेल्या भाविक नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले. मार्लेश्वर वार्षिक यात्रोत्सवात बुधवारी (ता. १४) दुपारी मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा विवाहसोहळा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोठ्या थाटामाटात झाला. विवाहानंतर मार्लेश्वर, गिरिजादेवी व यजमान वाडेश्वर या तिन्ही पालख्या मार्लेश्वर शिखरावरच थांबल्या. गुरूवारी मार्लेश्वर शिखरावरून मार्लेश्वराची पालखी आंगवली येथे घरोघरी दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झाली. साखरप्याची गिरिजादेवीची व देवरूखची वाडेश्वराची पालखी आपापल्या मूळ स्थानाकडे मार्गस्थ झाली. त्यामुळे काल सकाळपासूनच मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रेला मारळ येथे प्रारंभ झाला. मारळ शाळेपासून ते मारळ येथील मुख्य बसथांब्यापर्यंत विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. या दुकानांमधून विविध वस्तूंची खरेदी करत अबालवृद्ध व महिलांनी यात्रेला गर्दी केली होती. सायंकाळी या यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली. मार्लेश्वराची यात्रा सुरू असतानाच पहिल्यांदा गिरिजादेवीच्या पालखीचे मारळ नगरीत आगमन झाले. यानंतर काही वेळानंतर वाडेश्वर व त्या पाठोपाठ मार्लेश्वराच्या पालखीचे आगमन झाले. या तिन्ही पालख्यांचे मारळ येथे आगमन होताच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या भाविक नागरिकांनी या पालख्यांचे मनोभावे दर्शन घेतले.
