प्रजासत्ताक दिनासह सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला बूस्टर मिळाला आहे. मुंबई, पुण्यासह परराज्यातून हजारो पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले असून, केवळ दोन दिवसांत जिल्ह्यात ५ कोटींहून अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. “गणपतीपुळेत दोन दिवसांत ७५ हजार पर्यटक आल्याची नोंद झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दापोलीच्या किनाऱ्यांवर गर्दी झाली असून, दिवाळी सुट्यांनंतर प्रथमच कोकणात पर्यटकांची एवढी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दापोलीतील मुरुड, कर्वे, लाडघर, पाळंदे, हर्णे व आजर्ले हे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. केवळ किनारेच नव्हे, तर शहरातील हॉटेल्स, लॉजेस आणि ‘होम स्टे’ पूर्णतः बुक झाले आहेत. गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर, वेळणेश्वर आणि कशेळी येथेही अशीच स्थिती असून, वॉटर स्पोर्टस् आणि पॅरासेलिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनी अस्सल कोकणी खाद्यसंस्कृतीला पसंती दिली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या माहितीनुसार, ताजी मासळी आणि चिकन थाळीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. शाकाहारी पर्यटकांमध्ये ‘उकडीच्या मोदकां’ना विशेष मागणी असून, बाजारपेठेत मोदकांची मोठी विक्री होत आहे.
विघ्नहर्त्याची ओढ – रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेत शनिवारी ३५ हजार, तर रविवारी ४० हजारांहून अधिक पर्यटक येऊन गेल्याची नोंद श्रींच्या मंदिरात झाली. सोमवारी (ता. २६) दिवसभरात ३५ हजार पर्यटक येऊन जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे एकट्या गणपतीपुळेत सरासरी पर्यटकाने ५०० रुपये खर्च केल्याचा अंदाज धरला, तर सुमारे पाच कोटींची उलाढाल झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे यंदा पर्यटन व्यवसायाला उभारी मिळाल्याचे दिसत आहे.
चौपदरीकरणाचा फटका संगमेश्वरवासीयांना – पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर परिसरात वाहतुकीचा ताण वाढला आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे संगमेश्वर एसटी स्थानकासमोर सुमारे दीड किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सोनवी पुलादरम्यान नियोजनाचा अभाव असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली, ज्याचा फटका स्थानिक बाजारपेठेलाही बसला.
आंबेड पोलिसपाटलांची धाव – शनिवारी संध्याकाळी उशिरा संगमेश्वर चौकात पोलिस उपस्थित्त नसल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प होती. एसटी बससह अनेक वाहने अडकून पडली असताना आंबेडचे पोलिसपाटील सुरेश रहाटे यांनी पुढाकार घेतला.
