शहरातील भोगाळे परिसरात खोल आणि पाणथळ जागेत वाशिष्ठी नदीचा गाळ टाकून भराव केला जात आहे. हे धोकादायक असून, पावसाळ्यात शिवनदीचे पाणी पात्र सोडून भोगाळे येथील रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. चिपळूण शहरात २०२१ मध्ये महापूर आला. वाशिष्ठी नदीतील गाळामुळे पूर आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नदीतील गाळ काढण्याचे वार्षिक काम सुरू झाले ते यावर्षीही सुरू आहे. नदीतील गाळ काढून तो शहरातील पाणथळ भागात टाकला जात आहे. खोल जागेत भराव करून त्या जागा उंच केल्या जात आहेत. शहरातील अनेक व्यावसायिकांनी नदीतील गाळ आपल्या जागेत टाकण्यासाठी महसूल विभागाकडे मागणी केली आहे. शहराच्या पुराला जेवढी वाशिष्ठी नदी जबाबदार आहे तेवढीच शिवनदीसुद्धा जबाबदार आहे. शिवनदी जेव्हा पात्र सोडते तेव्हा नदीच्या दोन्ही भागांत पाणी पसरते. जसा पाऊस कमी होतो, तसे पाणीपात्रात परत जाते.
भोगाळे भागात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. त्यामुळे नागरी वस्तीवर शहरात भरणाऱ्या पाण्याचा फार परिणाम दिसत नव्हता. शहरात पाणी भरले तर चिंचनाका ते बुरूमतळी भागाकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा असायचा; मात्र सध्या भोंगाळे परिसर हळूहळू दोन्ही बाजूंनी भराव टाकून उचलला जात आहे. शहरातील भोंगाळे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने टाकला जात आहे. त्यातून रस्त्याची उंची वाढवली जात आहे. त्याचे गंभीर परिणाम पावसाळ्यात दिसण्याची शक्यता आहे. चिपळूण पालिका ते खंड बायपासपर्यंत सर्व घरे-निवासी सोसायट्या यांनी २०२१ ची परिस्थिती अनुभवली आहे. शहरातील खोल भागात भराव केले गेले तर पावसात शिवनदीच्या पात्रातील पाणी रस्त्यावर येण्याचा धोका आहे. भोंगाळे परिसरात सध्या नवीन बांधकाम केले जात आहे. खोल जागेत भराव टाकून तेथे अपार्टमेंट बांधल्या जात आहेत. भराव टाकून नव्या इमारती झाल्या तर शिवनदीच्या पाण्याला जाण्यासाठी मार्ग मिळणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
