मुस्तफिझूर रेहमानला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर दबावतंत्राचा अवलंब करीत असलेल्या बांगलादेशने आता त्यांच्या देशात आयपीएल प्रक्षेपण न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्तफिझूरला संघातून दूर करावे, अशा सूचना बीसीसीआयने आयपीएलमधील संघ कोलकाता नाइट रायर्डसला देताना कोणतेही व्यवहार्य कारण दिले नाही, त्यामुळे आयपीएलच्या प्रक्षेपणाला आम्ही आमच्या देशात बंदी घालत आहोत, असे बांगलादेशच्या प्रसारण मंत्रालयाने एका पत्रकात म्हटले आहे. यंदाची आयपीएल २६ मार्चपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी काल बांगलादेश क्रिकेट मंडळाने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतील सामने श्रीलंकेत हलविण्याची मागणी आयसीसीकडे केली होती.
मुस्तफिझूरला अशा प्रकारे कोणतेही ठोस कारण न देता दूर करणे, हा आमचा अपमान असून, बांगलादेशींचा सन्मान दुखावला गेला आहे, असे सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. परिणामी, आम्ही पुढील निर्णय घेईपर्यंत आयपीएलचे बांगलादेशमधील प्रक्षेपण बंद करीत आहोत, असाही उल्लेख करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत आणि त्यांना जिवे मारण्यातही येत आहे, याचे तीव्र पडसाद भारतात उमटत आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सध्याच्या परिस्थितीनुसार कोलकाता संघाने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिझूरला संघातून दूर करण्याच्या सूचना शुक्रवारी दिल्या होत्या, त्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत.

