HomeRajapurकोदवली धरणाचे काम अंतिम टप्यात

कोदवली धरणाचे काम अंतिम टप्यात

धरणाच्या कामाची नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांनी पाहणी केली.

कोदवली येथील ब्रिटिशकालीन सायबाच्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्याने धरण बांधण्यात येत असून, या धरणाच्या कामाची नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांनी पाहणी केली. राजापूरवासीयांना बारमाही मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाचे काम वेळेत पूर्ण करा आणि कामात गुणवत्ता राखा, अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनासह ठेकेदाराला केल्या आहेत तसेच या धरणाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष खलिफे यांच्यासह राजापूर नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, स्वप्नील पड्यार, दिवाकर खडपे, ठेकेदार गदगू जाधव आदी उपस्थित होते. सुमारे १४७ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी कोदवली येथे बांधलेल्या सायबाचे धरण राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत राहिलेला आहे. या धरणावरून विजेशिवाय अखंडितपणे राजापूर शहराला पाणीपुरवठा होत आहे. नादुरुस्त धरण, जीर्णावस्थेमुळे ठिकठिकाणी फुटलेली जलवाहिनी आणि साचलेला गाळ यामुळे धरणातून पाणीपुरवठा होण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.

त्यामुळे भविष्यात शहराचा होणारा विस्तार आणि वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. धरणाच्या झालेल्या कामाची नगराध्यक्ष खलिफे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी सद्यःस्थितीमध्ये धरणाच्या झालेल्या कामाचा सविस्तरपणे आढावा घेतला. तर, धरणाच्या उर्वरित राहिलेल्या कामापैकी १७ गेटचे काम, एम-३० काँक्रिटचे काम, सीपीसीसी ट्रीटमेंट, पाईपलाईन टाकणे, धरणावर जाण्यासाठी काँक्रिट रस्ता, विद्युतीकरण करणे आदी कामांच्या अनुषंगाने पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. धरणाचे शिल्लक राहिलेले काम वेळेमध्ये पूर्ण होताना कामाची योग्य प्रकारची गुणवत्ता राखण्याची सूचनाही त्यांनी प्रशासन आणि ठेकेदार यांना केली. नव्या कोदवली धरणाचे काम पूर्ण होऊन त्या धरणामध्ये पाणीसाठा झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून राजापूर शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments