HomeRatnagiriकोकणची सागरीसुरक्षा रामभरोसे…

कोकणची सागरीसुरक्षा रामभरोसे…

गस्तीसाठी असलेल्या १६ बोटींच्या देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्नही गंभीर आहे.

सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या काही घटना अलीकडे घडल्या. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये श्रीवर्धन (हरिहरेश्वर) किनाऱ्यावर एके ४७ रायफल्स आणि २५० काडतुसे असलेली बोट सापडली. रत्नागिरी आणि रायगडच्या किनाऱ्यांवर ८ कोटी ३६ लाख रुपये किमतीची २०९ किलो वजनाची चरसाची पाकिटे सापडली. ही पाकिटे कुठून आली आणि कोणासाठी होती, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही; मात्र जेएनपीटीसारख्या आंतरराष्ट्रीय बंदरातूनही तस्करीच्या घटना समोर आल्याने चिंता वाढली आहे. सागरीसुरक्षेसाठी शासनाने १४ मार्च २०२४ च्या निर्णयान्वये २० नवीन आधुनिक बोटींच्या खरेदीसाठी ११७.६० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली; मात्र, हा निर्णय कागदावरच असून, बोटींची खरेदी अद्याप झालेली नाही. सद्यःस्थितीत गस्तीसाठी असलेल्या १६ बोटींच्या देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्नही गंभीर आहे.

कोळीवाद्यांशी तटलेला संपर्क – सागरीसुरक्षेत स्थानिक मच्छीमार हे ‘कान आणि डोळे’ असतात; मात्र, पोलिस यंत्रणा आणि मच्छीमार संस्था यांच्यात समन्वयाचा मोठा अभाव आहे. ‘सागरमित्र’ किंवा ‘पोलिसमित्र’ यांची नियुक्ती अपुरी असल्याने कोळीवाड्यातील महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचत नाही. त्यातच मच्छीमार बोटींवर काम करणारे खलाशी हे रोहिंग्या आणि बांगलादेशी असण्याचे प्रमाण वाढत असून, हा सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कोकणची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी आता जुजबी मलमपट्टी चालणार नाही. रायगड आणि रत्नागिरीत स्वतंत्र ‘महाराष्ट्र कोस्टल अॅकॅडमी’ उभारणे, ५२ असुरक्षित लैंडिंग पॉइंट्सवर सुरक्षारक्षक नेमणे आणि सागरीगस्तीसाठी AI युक्त ड्रोनचा वापर करणे ही काळाची गरज आहे. मच्छीमार बोटींना परवाना (टोकण) सक्तीचे करून घुसखोर खलाश्यांवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ स्थापन करावा लागेल. ‘सुरक्षित सागर, सुरक्षित भारत’ हे धोरण केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे.

चिंतेची प्रमुख कारणे – आधुनिक मोजणीत राज्याची किनारपट्टी ८७७ किमी झाल्याने सुरक्षेवर ताण. सागरी किल्ले आणि बेटांवर होणारे अतिक्रमण आणि डिझेल चोरीचे रॅकेट. कोळीवाडे व सागरी किनारपट्टी क्षेत्रात झालेले बाहेरच्या लोकांचे अतिक्रमण. १३० पेक्षा जास्त संवेदनशील प्रवेशस्थळे व त्यावरील अपुरी सुरक्षा व्यवस्था. १२ सागरी मैलाबाहेरच्या क्षेत्रात गुन्हे, अनधिकृत प्रवेश रोखण्यात अडथळे. अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्री, अद्ययावत शस्त्र, बोटी अशा साधनांची कमतरता.

हे उपाय परिणामकारक ठरतील – सागरीसुरक्षेसाठी नवीन ठाणी व जुन्यांना सागरी दर्जा. खाडीत गस्तीसाठी रिजिड इन्फ्लेटेबल बोट्स आवश्यक. संशयित बोटींवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर. घुसलेल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर कारवाई. अवैध मासेमारी, ड्रग्स, अवैध वाहतुकीविरोधात टास्क फोर्स. गडकिल्ले, सागरी बेटांवरील अनधिकृत बांधकामांवर कार्यवाही.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments