राज्य सरकारने यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखा विभागमार्फत तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क तसेच सोशल डीस्टनसिंग बंधनकारक राहणार आहे, याची दक्षता घेण्यात यावी, असे राज्य शासनाने म्हटले आहे.
कोरोना संक्रमीतांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून ब्रेक द चेन अंतर्गत या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्याने 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मागील वर्षी प्रमाणेच कोविड मुळे या तरतुदी लक्षात घेऊन राज्यात महाराष्ट्रचा 61 वा वर्धापन दिन समारंभ अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार फक्त जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात यावे, असे राज्य सरकारने नमूद केले आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि नागपूर या विभाग आयुक्तांनी ध्वजारोहणकरिता आवश्यक ती व्यवस्था करावी. तसेच तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्याचं ठिकाणी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच नियोजित ठिकाणी इतर कोणीही गर्दी न करता केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयामध्ये समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर तसेच नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांनीच केवळ उपस्थित राहावे. तसेच ज्या ठिकाणी मुख्य पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ एवढ्याच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच इतर कोणत्याही मान्यवरांना आमंत्रित करु नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच तसेच कवायती, संचलन यांचे आयोजन केलेले असेल तर ते रद्द करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच विधीमंडळ, उच्च न्यायालय इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीमध्ये ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पाडण्यात यावा. जर ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू शकले नाहीत तर, विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांनी व जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यात सध्या ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसण्यासाठी काहीतरी फायदा होईल. राज्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन केले असून, सर्व प्रकारचे राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांवर हे निर्बंध प्रभावीरित्या अंमलात यावेत यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या सर्वत्र बंदीच्या आदेशाचा संदर्भ लक्षात घेऊन राज्य शासनाने महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.