आज भारतीय चित्रपटाची ज्या व्यक्तीने मुहूर्तमेढ रोवली, त्या दादासाहेब फाळकेंची जयंती. या निमित्ताने मनोरंजन क्षेत्रातील आणि त्यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी आपण जाणून घेऊया. भारतामध्ये मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्कार दरवर्षी चित्रपट सृष्टीमध्ये विशेष कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्या 5 दशकांपासून हा पुरस्कार प्राप्त होत आहे. पण ज्यांचे नावे हा मनाचा पुरस्कार वितरीत केला जातो, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके नक्की आहेत तरी कोण ! जाणून घेऊया थोडक्यात.
दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटाचे जनक असे देखील संबोधले जाते. यांचे खरे नाव धुंडिराज गोविंद फाळके असे आहे. त्याचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी महाराष्ट्रामध्येच झालेला. ते चांगले लेखक असण्यासोबत, उत्कृष्ट दिग्दर्शक देखील होते. 19 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 95 पेक्षा जास्त चित्रपट केले असतील. दादासाहेब फाळके नेहमीच कलेमध्ये रमत असत. तसेच त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी 1885 सालामध्ये जे जे कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. यासह वडोदरा येथील कलाभवन येथून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. 1890 मध्ये दादासाहेब वडोदरा येथे गेले असता, तिथे त्यांनी काही काळ एक छायाचित्रकार म्हणून सुद्धा काम केले. परंतु, आपली पहिली पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर त्यांनी आपली नोकरी सोडली. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी स्वत:ची प्रिंटींग प्रेस सुरू केली.
भारतीय कलाकार राजा रवी वर्मा यांच्याबरोबर काही काळ काम केल्यावर अनुभव घेऊन ते प्रथमच भारताबाहेर जर्मनीला गेलेले. जिथे त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला चित्रपट दि लाइफ ऑफ क्राइस्ट पाहिला आणि तेंव्हापासून त्यांच्या डोक्यात पहिला चित्रपट बनवण्याचे विचार घोळू लागले, त्यांनी तसा निर्णय घेतला. परंतु, त्या काळात एखादा चित्रपट तयार करणे सहज शक्य नव्हते. पहीला चित्रपट तयार करताना त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांना तब्बल सहा महिने लागले. दादासाहेबांनी त्यांची पत्नी व मुलाच्या मदतीने स्वत: चा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवला. त्या काळात हा चित्रपट बनविण्यासाठी त्यांना 15 हजार रुपये एवढा खर्च आला. आजच्या काळात जरी ही रक्कम किरकोळ वाटत असली, तरी त्या काळात या रक्कमेचे महत्व नक्कीच मोठे होते. राजा हरिश्चंद्र चित्रपटामध्ये दिग्दर्शनासह स्वत: दादासाहेबांनी अभिनय केला होता. त्यांची पत्नी पोशाख तयार करण्याचे काम करत होती आणि त्यांच्या मुलाने चित्रपटामध्ये हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका साकारली होती. पूर्वीच्या काळी महिला कलाकार मिळणे अशक्यप्राय गोष्ट. तेंव्हा कोणतीही महिला काम करण्यास तयार होट नसत. त्यामुळे दादासाहेबांच्या चित्रपटात महिलेची भूमिकाही एका पुरुषानेचं साकारली होती. मुंबईतील कोरोनेशन थिएटरमध्ये हा चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप वाहवा मिळाली आणि तो चित्रपट सुपरहिट झाल्याचे सिद्ध झाले. अशा प्रकारे मेहनतीने आणि कुटुंबाच्या मदतीने दादासाहेब फाळके यांनी भारतात चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली.