HomeRatnagiriमारळमध्ये मार्लेश्वर-गिरिजादेवीचा आज विवाह

मारळमध्ये मार्लेश्वर-गिरिजादेवीचा आज विवाह

वरूख, साखरपा, संगमेश्वर बसस्थानकातून यात्रोत्सवासाठी जादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

देवाला हळद लागली….. घाणा भरून झाला….. हिंदू धर्मातील लिंगायत विवाहशास्त्रानुसार होणारे विवाहापूर्वीचे सर्व पारंपरिक विधी पार पडले आहेत. आता साऱ्यांना बुधवारी (ता. १४) होणाऱ्या श्री देव मार्लेश्वराच्या आणि साखरप्याच्या गिरिजादेवी या दोन देवतांच्या विवाहाची प्रतीक्षा आहे. सह्यकुशीत होणारा हा देवतांचा कल्याण विधी सोहळा मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर दुपारी १२ नंतर होणार आहे. यासाठी असंख्य शिवभक्त मारळमध्ये दाखल झाले आहेत. ११ जानेवारीपासून सुरू झालेल्या मार्लेश्वर यात्रोत्सवातील श्री देव मार्लेश्वराच्या विवाहापूर्वीचे सर्व विधी आंगवली येथील मूळ मठात झाले असून, बुधवारी हा विवाहसोहळा रंगणार आहे. मठात सत्यनारायणाची पूजा झाल्यावर पुजाऱ्यांनी मठातील मार्लेश्वराचा टोप हलवून तो सुवासिनींकडे दिला. मातागंगेची मूर्तीही यावेळी मानकरी अणेरावांच्या मांडीवर ठेवत दोघांचेही घाणे भरण्याचा सोहळा पार पडला. यानंतर देवाला आणि गंगामातेला हळद लागल्यावर त्यांना सुवासिनींनी शुद्ध पाण्याने स्नान घातले. त्यानंतर देवाचा टोप आणि गंगामातेची मूर्ती जागेवर ठेवण्यात आली. रात्री विवाहापूर्वीचे सर्व धार्मिक विधी झाल्यावर मध्यरात्री १२ वाजताच यजमान वाडेश्वर, देवरूखची दिंडी, वांझोळेची कावड, लांजा-वेरळमधून आलेल्या दिंडीसह शेकडो भाविकांना बरोबर घेत चर्मकार बंधूंच्या मशालीच्या साहाय्याने मार्लेश्वराच्या पालखीने शिखराकडे प्रस्थान केले.

या पालखीसोबत लांजा वेरवलीचे मराठे, पाटगावचे मठाधिपती, आंगवलीचे मानकरी अणेराव, पुजारी जंगम यांच्यासह वाडेश्वरासोबत आलेले मानकरी आणि भाविक यांचा समावेश आहे. नवरदेवाच्या पालखीत गंगामाता आणि मल्लिकार्जुन विराजमान असून, रात्री उशिरा या पालख्या पवईजवळ आल्या. त्यानंतर साखरप्यातून गिरिजामातेची पालखी एकत्र आल्यावर सर्व पालख्यांनी हर हर महादेवाचे गजर करत शिखराकडे प्रयाण केले. यात्रोत्सवातील मुख्य दिवसासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शिखरावर दर्शनासाठीही रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारचा कल्याणविधी सोहळा झाल्यावर सर्व पालख्यांचे शिखरावरच वास्तव्य असणार आहे. यात्रोत्सवासाठी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. देवरूख, साखरपा, संगमेश्वर बसस्थानकातून यात्रोत्सवासाठी जादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments