कोल्हापूरमधील बहिरेवाडी या गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरमधील काटोल तालुक्यातील भूषण सतई या महाराष्ट्राच्या जवानांना वीरमरण आले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान शुक्रवारी अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेच्या युद्धबंदी कराराचे म्हणजेच एल.ओ.सी चे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. या झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले आहेत तर ३ नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाला.
ऋषिकेश जोंधळे घरचे एकुलते एक होते. एकुलता एक असल्याने कुटुंबीयांतील सदस्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याला विरोध केला, परंतु २०१८ साली एकदा प्रयत्न करतो म्हणून घरातल्यांना समजावून पहिल्याच प्रयत्नात ऋषिकेश सैन्यात भरती झाले. पहिलीच पोस्टिंग जम्मू काश्मीरला मिळाली. बहिरेवाडीतील ग्रामस्त आणि कुटुंबामध्ये यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर त्यांच्या दुखाचा डोंगर कोसळला. अवघ्या २० व्या वर्षी त्यांना सीमेवर वीरमरण आले. ऐन दिवाळीमध्ये गावच्या सुपुत्राची शहीद झाल्याची बातमी गावात आल्याने सर्व गावकर्यांनी दिवाळी साजरी न करण्याचे एकमताने ठरविले. नेमकं भाऊबिजेच्या दिवशी त्याचं पार्थिव गावामध्ये आणले गेले, भावाला ओवाळण्या ऐवजी त्याला अंतिम निरोप देण्याची वेळ त्यांच्या बहिणी आणि कुटुंबावर आली. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषिकेश जोंधळे यांना त्यांचे चुलत भाऊ दीपक जोंधळे यांनी अग्नी दिला. यावेळी कुटुंबीयांसह गावकऱ्यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील जवान भूषण सतई शहीद हे सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाले. नागपूर मधील काटोल या गावी बरीच वर्षे भूषण सतई यांचे कुटुंब वास्तव्याला आहे. प्रथम कामठीच्या कॅन्टोन्मेंटमध्ये असलेल्या अमर योद्धा येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात आले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांना पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर काटोल येथे त्यांच्या घरी पार्थिव नेण्यात आले, गावामध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे. गावातून त्यांची अंत्ययात्रा निघाल्या नंतर शासकीय इतमामात त्याना अखेरचा निरोप देण्यात आला. ऐन दिवाळीत २० आणि २८ वर्षांचे हे सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे त्याचप्रमाणे पाकिस्तानबद्दल संतापही व्यक्त केला जात आहे.