चौपदरीकरणात चिपळूण शहरातील बौद्धवाडी परिसरात नगरपरिषदेच्या कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी अंडरपासची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली आहे. या मागणीसाठी बुधवारी चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर महामार्ग विभागाचे अधिकारी व नगराध्यक्ष यांच्यात आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात तातडीची बैठक पार पडली ती विफल ठरली. या बैठकीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत अंडरपासच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम करू देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. बौद्धवाडी परिसरात अंडरपास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणाहून युनायटेड हायस्कूलचे विद्यार्थी ये-जा करतात तसेच कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी वस्ती आहे. कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या गाड्या आहेत. पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय, सह्याद्री शिक्षणसंस्थेचे पाग हायस्कूल अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये व संस्था आहेत.
अंडरपास नसल्यास नागरिकांना तसेच कचरा प्रकल्पाच्या वाहनांना मोठा वळसा घालावा लागणार असून, यामुळे दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होतील, असे नगराध्यक्षांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे या ठिकाणी अंडरपासची तरतूद करणे अपरिहार्य असल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. या बैठकीला महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कुलकर्णी, चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, उपअभियंता नजीब मुल्ला, शाखा अभियंता शाम खुणेकर तसेच चेतक कंपनीचे प्रतिनिधी जयंती उपस्थित होते.
अंडरपास अत्यावश्यक – बौद्धवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितता व सोयीच्यादृष्टीने अंडरपास अत्यावश्यक असून, याबाबत नगराध्यक्षांनी कोणतीही तडजोड न करण्याची ठाम भूमिका घेतल्याने पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
