स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात एका कंपनीच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. त्त्या कामांचा आढावा आज पालिकेत शिवसेनेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी घेत अनेक आक्षेप घेतले. कंपनीच्या कामांना दर्जा नाही, कासवाच्या गतीने काम सुरू आहेत, अशी कामे होत राहिली तर बारा वर्षे लागतील, अशी टीका-टिप्पणी काही नगरसेवकांनी केली, तर काही प्रभागांत सात कोटींची कामे, तर काही प्रभागांत १० लाखांचीही कामे नाहीत, असा दुजाभाव केला, असा आरोप देखील उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी केला. त्यामुळे आजची ही आढावा बैठक चांगलीच गाजली. रत्नागिरी शहरामध्ये राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीअंतर्गत ४०० कोटी मंजूर आहेत. त्यापैकी २०० कोटींची विकासकामे शहरात सुरू आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे या विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. पोलिस वसाहत, जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीचे काम, विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग अशी अतिशय दर्जेदार कामे करणाऱ्या कंपनीला स्मार्टसिटीच्या विकासकामांचा ठेका दिला आहे. शहरात प्रत्येक प्रभागामध्ये ही विकासकामे सुरू आहेत. आज पालिकेच्या विषय समितीच्या सभापतींच्या निवडीनिमित्त आयोजित नगरसेवकांच्या बैठकीदरम्यान त्या कंपनीच्या कामाचा नगरसेवकांनी आढावा घेतला.
कंपनीचे अधिकारी एमआयडीसीचे अधिकारी बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण कामाची माहिती सभागृहाला दिली. या वेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. कामाची माहिती देत असताना ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये म्हणाले, “कंपनीने जे कामगार घेतले होते, त्यांचे पैसे देखील वेळेवर दिले नाहीत. माझ्याकडे एकदा नाही, दोनवेळा काही कर्मचारी आले. काम करून घेता, मग कामगारांचे पैसे द्यायला नको, ही बाब आमच्यापर्यंत येता कामा नये.” याबाबत सोहेल मुकादम यांनी देखील कंपनीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. कंपनीच्या कामाबाबत तक्रारी आहेत, अनेक ठिकाणच्या कामांना दर्जा नाही, सुमार काम झाले आहे तसेच कामाचा वेग अतिशय कमी आहे. त्यावर वेळेत पाणी मारण्याची तसदीदेखील घेतली जात नाही, अशा तक्रारी नगरसेवक निमेश नायर यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी केल्या.
