कोकणला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या राजापूर-अणुस्कुरा मार्गावरील ओणी-अणुस्कुरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, खड्डे तत्काळ बुजवून संपूर्ण मार्गाची दुरुस्ती करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाचल परिसरातील ग्रामस्थांनी यापूर्वी निवेदनाद्वारे दिला; मात्र त्याला बांधकाम विभागाने कचऱ्याची टोपली दाखवली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडून मुहूर्त शोधला जात आहे, अशी टीका पाचलवासीय करत आहेत. रस्त्यातील खड्डे चुकवताना आणि खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवून आणि त्यातून प्रवास करून वाहनचालकांसह प्रवाशांचे पुरते कंबरडे मोडून गेले. गाड्यांचीही अवस्था पुरती खिळखिळी झाली आहे. ‘रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त,’ अशी रस्त्याची स्थितीमध्ये आता धुळीची भर पडली असून, प्रवाशांसह वाहनचालकांना आता दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे.
ओणी-अणुस्कुरा रस्त्याची मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यामुळे पार चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी पाचल ते अणुस्कुरा घाटापर्यंत पडलेले खड्डे काही प्रमाणात बुजवले आहेत. वाहतुकीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पूर्वपरिसरातील अत्यवस्थ रुग्णाला अधिक उपचारार्थ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईकडे नेताना त्या रुग्णाला या खड्यामुळे अधिक त्रास होतो. यापूर्वी काही दुचाकीस्वार खड्ड्यामुळे पडले आहेत; मात्र त्यानंतरही रस्त्याची दुरवस्था कायम असून, त्याबाबत वाहनचालक, प्रवाशांसह ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या भागात पडलेत जास्त खड्डे – ओणी दैतवाडी परिसर, सौंदळ पाटीलवाडी, सौंदळ बाजारपेठ, कोळवणखडी, येळवण, रायपाटण.
