देवरूख शहराचा कायापालट घडवून आणण्यासाठी आवश्यक विकासकामांसाठी निधी द्या, अशी मागणी देवरूख नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, सौंदर्याकरण व मूलभूत विकासकामांसाठी विशेष निधी देण्याची मागणी या वेळी केली. आमदार निकम यांची नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, यशवंत गोपाळ, दीपक खेडेकर, संदीप वेळवणकर, सिद्धेश वेल्हाळ, अनुराग कोचिरकर, अक्षय झेपले, रूपाली बेंद्रे, श्रद्धा इंदुलकर, कविता नार्वेकर, रितिका कदम, मनस्वी आंबेकर, नगरसेविका अभिजित शेट्ये, प्रफुल्ल भुवड, रवींद्र लाड, रवींद्र आंबेकर हे उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार निकम यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. देवरूखच्या विकासासाठी महायुती सरकारकडे विशेष निधीची मागणी करू तसेच ठोक तरतूद व नगरोत्थान योजनेंतर्गत येणाऱ्या काळात भरीव विकास साधू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार म्हणून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून देवरूखच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
