तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मेकॅनिकची आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची फसवणूक केली. याबाबत तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एका अनोळखी महिलेचा सामावेश आहे. समीर म्हस्के (पूर्ण नाव माहीत नाही.) एका सहकारी बँकेतील लिपिक, नगर ठाणे येथील बँक खातेधारक रोहित प्रकाश म्हसकर व अन्य अनोळखी महिला असे संशयित आहेत. ही फसवणूक २७ जानेवारी २०२२ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मोबाईलद्वारे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षा मॅकेनिक उमेश शांताराम धनावडे (वय ३३, रा. करबुडे-मासेबाव, रत्नागिरी) संशयित समीर म्हस्के याने त्यांचा भाऊ तुषार शांताराम धनावडे, तसेच अन्य मित्र अजय विजय गोवळकर यांना आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावतो, त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले.
फिर्यादी यांनी वर्तक नगर-ठाणे येथील एका बँकेतील रोहित प्रकाश म्हसकर या नावाच्या खात्यावर २७ जानेवारी २०२२ ला ते १ मे २०२४ या कालावधीत एकूण ६ लाख ८६ हजार ५६१ रुपये तसेच वाडीतील मित्र तेजस वसंत धनावडे यांच्या मोबाईलवरून संशयित रोहित म्हसकर यांच्या बँकेच्या खात्यावर ३० मार्च २०२२ ते १९ मे २०२२ या कालावधीत ९३ हजार ९५० रुपयांची, तर १३ मे २०२४ ते १० जून २०२४ या कालावधीत वेळोवेळी १ लाख ८७ हजार रुपये बँक ट्रान्स्फर केले तसेच मोबाईलवरून अनोळखी महिलेने फोन करून रोहित म्हसकर यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितल्याने फिर्यादी उमेश धनावडे यांनी १० हजार खात्यावर बँक ट्रान्स्फर केले.
त्यानंतर पुन्हा संशयित समीर म्हस्के हा वारंवार फोन करून फिर्यादी यांना पैसे पाठवण्यास सांगितल्याने फिर्यादी उमेश यांनी १७ ऑक्टोबर २०२५ ला समीर म्हस्के याच्या मोबाईलवर १७ ते २७ऑक्टोबर २०२५ या मुदतीत गुगल पे द्वारे १ लाख ६२ हजार रुपये ट्रान्स्फर केले आहेत. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे एकूण ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची फिर्यादीची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी यांनी संशयित समीर म्हस्के याच्याकडे विश्वासाने ट्रान्स्फर केलेले पैसे परत मागितले असता संशयिताने पुन्हा फोन केलास तर बघून घेईन, अशी धमकी दिली. या प्रकरणी उमेश धनावडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तीन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

