जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘आयुष’ विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विभागातील ‘युनानी’ औषधांचा मोठा तुटवडा भासत आहे. उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना औषधांविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एकीकडे सरकार पर्यायी औषधोपचार पद्धतीचा प्रचार करत असताना, प्रत्यक्षात मात्र औषधांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा रुग्णालयातील या विभागात रोज सरासरी १० ते १५ रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात ‘युनानी तज्ज्ञ डॉक्टर’ वेळेवर ओपीडीमध्ये उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करत आहेत; मात्र, औषधेच उपलब्ध नसल्याने केवळ सल्ला देण्यापलीकडे डॉक्टरांच्या हातात काहीही उरलेले नाही. युनानी औषधे खासगी मेडिकल स्टोअर्समध्ये सहजासहजी मिळत नाहीत, त्यामुळे ‘तपासणी करून औषधे आणायची कुठून?’ असा संतप्त सवाल रुग्ण विचारत आहेत. ग्रामीण भागातून अनेक रुग्ण पदरमोड करून, प्रावासीभाडे खर्च करून जिल्हा रुग्णालयात येतात; मात्र, येथे आल्यावर औषधे मिळत नसल्याने त्यांना मानसिक त्रासासोबतच त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांचा आधार असलेला हा दवाखाना केवळ नावापुरताच उरला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा, अशीही मागणी होत आहे.
नागरिकांचा रोष – औषधाचा पुरवठा राज्यस्तरावरून केला जातो. हे प्रशासनाचे उत्तर तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले तरी तब्बल १८० दिवस (सहा महिने) औषधे उपलब्ध नसणे हे आरोग्य विभागाचे मोठे अपयश मानले जात आहे. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात स्थानिक प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. रत्नागिरीकर या त्रासातून कधी मुक्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने आता या गंभीर विषयावर वरिष्ठ अधिकांऱ्याच्या माध्यमातून लक्ष घालून आवश्यक तो पाठपुरावा करून तातडीने औषधे कशी उपलब्ध होतील, याचे नियोजन करावे लागणार आहे.
