मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचे थैमान घातले असून त्याचा सगळ्याच लहान ते मोठ्या गोष्टीवर विपरीत परिणाम झालेला जाणवत आहे. त्यातीलचं एक महत्वाचा चर्चेत असलेला विषय म्हणजे एस.टी. कर्मचाऱ्यांचे मागील ३ महिन्यांपासून रखडलेले पगार. गेले काही महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने, वाहतूक व्यवस्था पुर्णता: बंद करण्यात आली होती. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्याच्या नोकरीवर संकटाची टांगती तलवार होती. वेतन सुद्धा अनियमित झाल्याने कुटुंबाला पोसणार कसे असा गहन प्रश्न कर्मचाऱ्यांना उद्भवू लागला.
कालांतराने कोरोनाचे संसर्ग नियंत्रित येण्याची साधारण लक्षणे दिसताच सरकारने काही प्रमाणात एस.टी बसेसच्या फेर्या सुरु केल्या. परंतु सकाळी बसेस सुरु करून दुपारी बंद करण्यात आल्या. त्यामुळे जनता सुद्धा घराबाहेर पडताना साशंक झाली. कारण परतीच्या प्रवासाला बसेस उपलब्ध नसतील तर घरी पोहोचणार कसे? असा सवाल निर्माण झाला. त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे आणि बसेसच्या अनियमितेमुळे जनतेने घरीच राहणे पसंद केले. परंतु राहिला प्रश्न एस.टी कर्मचाऱ्यांचा,जरी प्रवासी नसले तरी बस घेऊन ठराविक ठिकाणी पोहोचणे त्यांना क्रमप्राप्त होते. एकही प्रवासी नसला तरी बस रिकामी आणावी लागत असे. कोरोनाच्या काळा पासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना तीन ते चार महिन्यांपासून वेतन प्राप्त न झाल्याने अनेकांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस.टी. महामंडळ आणि विद्यमान ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी मधील एस.टी. कर्मचारी पांडुरंग गडदे यांनी राहत असलेल्या भाड्याच्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
या दोन घटनांमुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे कि, एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बॅंकेकडे कर्ज देखील मागितले आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना लगेचचं एका महिन्याचं वेतन उपलब्ध करून देणार, आणि त्याचप्रमाणे सणासाठी कर्मचाऱ्यांना बोनस तात्काळ देणार आहोत. अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे, असं परब यांनी सांगितलं.
दिवाळीत बोनस तर सोडाच पण वेतनही वेळेवर झालेले नाही ही बाब गंभीर आहे. केंद्राने जसं पॅकेज दिलं तसं पॅकेज जर राज्याने दिले असते तर हि अशी वेळ आली नसती. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकारचं जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटनेने आक्रमकतेचे धोरण अवलंबले आहे.जर 2 दिवसामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर न भूतो न भविष्यती असं आंदोलन दिवाळी नंतर करणार असल्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.