खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चाफे सजाचा तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१) असे त्या संशयित तलाठ्याचे नाव आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच चाफे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदार यांनी मौजे आगरनरळ (जि. रत्नागिरी) येथे खरेदी खताद्वारे १० ठिकाणी बिनशेती क्षेत्र खरेदी केले आहे. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार होऊन स्वतःचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी ९ ऑक्टोबर २०२५ ला तलाठी कार्यालय चाफे येथे अर्ज केला होता. हा फेरफार करून नाव लावलेला ७/१२ उतारा आणि फेरफारची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचेच्या मागणीबाबत तक्रारदार यांनी ३१ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी १ जानेवारी २०२६ करण्यात आली. पडताळणी दरम्यान, चव्हाण याने १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने चाफे येथील कार्यालयात सापळा लावला. तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना चव्हाण याला पंचांच्या समक्ष रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रत्नागिरी युनिटचे पोलिस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक फौजदार उदय चांदणे, पोलिस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलिस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समितां क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांचा समावेश होता.
