देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी टाटा उद्योग समूहाकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल पाहता सर्व स्तरातून त्यांच्या या निर्णयाची प्रशंसा केली जात आहे. देशात कधीही अडचणीचा काळ उभा राहिला तर प्रत्येक वेळी काही मंडळी हिरीरिनं पुढे येत मदतीचा हात पुढे करतात आणि टाटा उद्योग समूह हे नाव कायमच अव्वलस्थानी आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळं अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकरी गमावलेल्या. पण, कंपन्यांच्या या निर्णयाला विरोध करत देशाच्या उद्योग जगातील एक सन्माननीय नाव असणाऱ्या श्री रतन टाटा यांनी मात्र धारेवर धरत त्यांना खडे बोल सुनावले होते. रतन टाटा त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वासह, एक उत्तम उद्योजक म्हणून सुद्धा अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक गोष्टीचा आणि समाजातील घटकाचा चहूबाजूंनी विचार करण्याची त्यांची हीच वृत्ती टाटा उद्योगसमूह बहुविध मार्गांनी पुढे नेत आहे, असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
कोरोना बाधितांच्या उपचारांमध्ये आवश्यक असणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा टाटा स्टीलकडून करण्यात येणार असल्याच्या त्यांच्या या घेतल्या गेलेल्या महत्वपूर्ण निर्णयाने एक प्रकारचा भक्कम आधार मिळाला आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकिय ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. देशावर ओढावलेली ही भयानक परिस्थिती लक्षात घेता टाटा उदयोग समूहाने स्पष्ट केले आहे कि, आम्ही दर दिवशी आवश्यक असणाऱ्या 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा राज्य शासनासह रुग्णालयांनाही पुरवठा करत आहोत. आपण ही लढाई एकत्रित रित्या लढल्याने नक्कीच आपण ही लढाई जिंकू, अशा प्रकारचे ट्विट टाटा स्टीलकडून करण्यात आलं. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. वी. नरेंद्रन यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कंपनीकडून झारखंड शिवाय उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे सध्या ऑक्सिजन पुरवला जात आहे.
देशात काल दोन लाख ९४ हजार नवीन कोरोनासंक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. एवढी वाढीव संख्या पाहता आरोग्य सुविधांवर ताण येत असून विविध प्रकारची कमतरता अनेक ठिकाणी जाणवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे याच पार्श्वभूमीचा विचार करून देशासाठी कायम अडचणीमध्ये प्रथम स्थानी हजार असणाऱ्या टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा दररोज करण्यास सुरुवात केली आहे. पण पंतप्रधान मोदींनी मंगळवारी केलेल्या कळकळीच्या विनंतीनंतर आता टाटा ग्रुपने आपल्या देशासाठी परदेशातून काही अत्यावश्यक सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाने मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन शेअर करण्यात आली आहे.
टाटा कंपनीकडून भारताची आरोग्य व्यवस्था मजबूत बनविण्यासाठी आम्हाला जे जे शक्य आहे ते सर्व प्रयत्नपूर्वक सहाय्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सद्य परिस्थितीत जाणवलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे ट्वीट करण्यात आले आहे. देश सध्या देत असलेल्या कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.