HomeMaharashtra Newsआज लॉटरी फुटणार! मुंबईचा महापौर कोण? 'ठाकरे' नाव चर्चेत

आज लॉटरी फुटणार! मुंबईचा महापौर कोण? ‘ठाकरे’ नाव चर्चेत

आरक्षणाची लॉटरी हाच या सगळ्या खेळाचा कळीचा मुद्दा आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनंतर जरी सत्तासमीकरण कागदावर स्पष्ट दिसत असले, तरी महापौरपदाच्या शर्यतीमध्ये मुंबईच्या राजकारणात प्रचंड उत्सुकता आणि तणाव निर्माण झाला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा महापौर नेमका कोण होणार, हा प्रश्न सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. बहुमत असूनही भाजप आणि महायुती पूर्णपणे निर्धास्त नाहीत. आरक्षणाची लॉटरी हाच या सगळ्या खेळाचा कळीचा मुद्दा आहे. बीएमसीत एकूण २२७ जागा ‘असून बहुमतासाठी ११४ नगरसेवकांची आवश्यकता असते. महायुतीकडे ११८ नगरसेवक असल्याने संख्याबळाच्या जोरावर त्यांची बाजू भक्कम वाटते. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटी गटाकडे मनसेसह मिळून सुमारे ७१ नगरसेवक आहेत. मात्र महापौरपद हे केवळ संख्येवर ठरत नाही, तर ते आरक्षणाच्या लॉटरीवर अवलंबून असते. हीच बाब सध्या भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.

उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी महापौरपदासाठी आरक्षणाची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीत महापौरपद अनुसूचित जाती, ओबीसी किंवा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठरणार की नाही, हे ठरणार आहे. मागील वेळी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते, मात्र यंदा आरक्षण रोटेशननुसार बदलणार आहेः भाजप आणि शिंदे गटाकडे एससी आणि ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक आहेत. मात्र जर लॉटरीत एसटी प्रवर्ग निघाला, तर सगळं चित्रच बदलू शकतं. सध्या मुंबईत एसटी प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक फक्त शिवसेना यूबीटीकडे आहेत. यामध्ये वार्ड क्रमांक १२१ मधून विजयी झालेल्या प्रियदर्शिनी ठाकरे आणि वार्ड ५३ मधून निवडून आलेले जितेंद्र वलवी यांचा समावेश आहे. त्यामुळे एसटी आरक्षण निघाल्यास महायुतीकडे बहुमत असूनही महापौरपदासाठी पात्र उमेदवारच उरणार नाही. अशा परिस्थितीत यूबीटी गटाकडे महापौरपद जाण्याची प्रबळ शक्यता आहे आणि प्रियदर्शिनी ठाकरे ‘किंगमेकर’ किंवा थेट महापौरही ठरू शकतात.

निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल असे विधान केले होते. हे विधान अनेकांनी हलक्यात घेतले, मात्र आता त्यामागचा राजकीय अर्थ स्पष्ट होत आहे. लॉटरीचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागल्यास अल्पसंख्य असूनही ते सत्ता मिळवू शकतात. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप या लॉटरी प्रक्रियेबाबत पर्यायी मार्गांचा विचार करत आहे. २०२२ मध्ये निवडून आलेल्या बॉडीचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास साडेतीन वर्षे महापालिका प्रशासकांच्या ताब्यात होती. त्यामुळे आरक्षण रोटेशन नव्याने करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे २१ आणि २२ जानेवारीचे राजकीय घडामोडी अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत.

या सगळ्यात प्रियदर्शिनी ठाकरे यांच्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. त्यांनी वार्ड १२१ मधून अवघ्या १४ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. दुसरीकडे जितेंद्र वलवी यांनीही शिंदे गटाच्या उमेदवारावर मात केली आहे. विशेष म्हणजे महापौरपदासाठीची लॉटरी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दीच्या अगदी एक दिवस आधी होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा राजकीय योगायोग आपल्यासाठी शुभ ठरेल, अशी आशा आहे. एकूणच, महापौरपदाची लॉटरी भाजपसाठी पेच निर्माण करणारी ठरत असून, ठाकरे आडनाव पुन्हा एकदा मुंबईच्या सत्तेच्या केंद्रस्थानी येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments