HomeRatnagiriलांज्यात राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

लांज्यात राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावला आहे.

तालुक्यातील कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने कुर्णे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असल्याचे अंदाज स्थानिक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुर्णे येथीलच संशयीत नंदकुमार रविंद्र पांचाळ याला ताब्यात घेवून अधिक तपासाअंती अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रामचंद्र पड्ये (४५ वर्षे, रा. कुर्णे, पडयेवाडी, ता. लांजा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एकटेच घरी राहत होते. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुरेश पडये यांच्या मुंबई येथे असलेल्या मुलीने वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने सोमवारी १९ जानेवारी रोजी रात्री चुलत काका शाम पड्ये यांना आपल्या घरी जावून पाहण्यास सांगितले. त्यानुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शाम पड्ये हे सुरेश पडये यांच्या घरी गेले असता घरातच त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

हा प्रकार लक्षात येताच त्याची माहिती तत्काळ लांजा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी २० जानेवारी रोजी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत फिर्यादी शाम लक्ष्मण (४५ वर्षे, रा. कुर्णे, पडयेवाडी, ता. लांजा) यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी नंदकुमार पांचाळ (२५ वर्षे, रा. कुर्णे, सुतारवाडी, ता. लांजा) व सुरेश पडये हे दोन्ही कायम एकत्र फिरत असायचे, एकत्रित मजुरीचे काम करायचे आणि एकत्र दारूही प्यायचे. नंदकुमार पांचाळ हे सुरेश पडये यांच्या घरात दारू पिऊन भांडणे देखील करत असत. अशातच सुरेश पडये आणि नंदकुमार पांचाळ यांच्यात दारू पिऊन भांडण झाले आणि नंदकुमार पांचाळ याने सुरेश पडये याच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर दुखापत केल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे रक्त वाहून जाऊन सुरेश पडये याचा मृत्यू झाला असल्याचे सांगत शाम पड्ये यांनी खून केल्याची तक्रार पोलिसांत दिली.

त्यानुसार पोलिसांनी संशयीत नंदकुमार पांचाळ याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.म याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात नंदकुमार पांचाळ याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक अमित यादव (राजापूर पोलीस ठाणे अतिरिक्त पदभार लांजा पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीम. देवकन्या मैंदाड या करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments