दरवर्षी जगभरामध्ये २२ एप्रिल या दिवशी जागतिक पृथ्वी दिवस साजरा केला जातो. २२ एप्रिल १९७० रोजी प्रथम जागतिक अर्थ दिन साजरा केला गेला. नंतर पृथ्वीचे संरक्षणाखातर हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला. निसर्ग आणि मानवामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि योग्यरित्या सन्मान राखण्यासाठी या दिवसाची सुरुवात नेल्सन यांनी केलेली. त्यांनी या दिवसाच्या निमित्ताने लोकांना असा संदेश दिला की जर पृश्वीवर जर मनुष्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर प्रत्येकाने पृथ्वी बद्दल विचार करणे गरजेचे आहे.
गुगल काही खास दिवसानिमित्त कायमच काहीतरी हटके डूडल तयार करून संदेश देत असत. या वर्षी सुद्धा एक खास प्रकारचे डूडल गुगलने साकारले आहे. या खास डूडलच्या माध्यमातून अर्थ डे अवेअरनेस म्हणून लोकांसाठी खास संदेश दिला आहे. लोकांनी डुडल व्हिडिओद्वारे पृथ्वीवर जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करून पृथ्वीला उजाड होण्यापासून वाचवले पाहिजे, अशा प्रकारचा संदेश दिला आहे. जगत सर्वात पहिला अर्थ डे सेलेब्रेशन २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेचे जेराल्ड नेल्सन यांनी केले.
पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक पृथ्वी दिन हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण, नैसर्गिक स्त्रोतांवर वाढणारा ताण, वातावरणातील वाढलेले असंतुलन यामुळे कालांतराने अशी वेळ येऊ शकते कि, पृथ्वीवर राहण्यास सुद्धा जागा उपलब्ध नसेल आणि हा दिवस फार दूर असेल. म्हणूनच प्रत्येकाने स्वतची जबाबदारी समजून योग्य वेळी जागे होणे आवश्यक आहे. पृथ्वीच्या रक्षणासाठी स्वतचे कर्तव्य बजावले पाहिजे. केवळ हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून, गेल्या 50 वर्षांपासून संपूर्ण जगात जागतिक पृथ्वी दिन साजरा करतो आहे. दरवर्षी जागतिक पृथ्वी दिनासाठी एखादी थीम निश्चित केली जाते. यंदाची थीम ही पृथ्वी पुनर्संचयित करण्यासाठी आहे. पृथ्वी स्वच्छ आणि स्वस्थ करण्यासाठी जग जे काही करू शकेल त्याचा विचार केला जाईल. गेल्या वर्षी जागतिक अर्थ दिनाचा विषय हवामान क्रिया होता जो खरोखर महत्वाचा मुद्दा ठरला होता. दरवर्षी आयोजक एका नवीन विषयाला धरून थीम ठरवतात.
गुगलने आज साकारलेले डुडल खास आहे. गुगल होम पेज सर्च करताच एक काही सेकंदांच एनिमेटिड डूडल दिसते. ज्यामध्ये एक मोठे झाड आणि काही छोटी छोटी झाडे आसपास नजरेस येत आहेत. याशिवाय, एका मोठ्या झाडाखाली दोन मुले बसलेली दाखवली आहेत. हे एनिमेटिड डूडल व्हिडिओ आहे. यावर प्ले करण्यासाठी बटन सुद्धा दिले गेलेले आहे. डुडल वरील प्ले बटणावर क्लिक केले असता, एक व्हिडिओ सुरु होतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कि, एक लहान मुलगी झाड लावत आहे. जसजसे तिचे वय वाढते तसतसे ते झाड सुद्धा मोठ होत बहरत जाते. ती वृद्ध झाल्यावर मात्र एक नवीन झाड नवीन पिढीच्या मुलाच्या हातात देते. त्या मुलासोबत ते झाड सुद्धा मोठे होते. गुगलच्या या संदेशात्मक डूडलद्वारे लोकांमध्ये निसर्गाप्रती जागरुकता निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. स्वतः झाडे लावा. आपल्या भविष्यातील पिढीला झाडे लावण्यासाठी उद्युक्त करा. त्यांनाही वृक्षारोपण करण्यासाठी प्रेरित करा. आपले आणि आपल्या पुढील पिढीसाठी एक निरोगी अशी पृथ्वी निर्माण करण्याचा संदेश यातून दिला गेला आहे.