आपल्या दमदार अभिनयामुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. ‘अग्गबाई सासूबाई’ या टीव्ही मालिकेत अभिनय करताना ते छोट्या पडद्यावर शेवटचे दिसले. याशिवाय अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. भारदस्त व्यक्तिमत्व, या व्यक्तमत्वाला शोभणाऱ्या झुपकेदार मिशा, भारदस्त आवाज, विविध विषयांचा व्यासंग, वाचन आणि सहकलाकारांसोबत असलेले मैत्री ही रवी पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख होती. रवी पटवर्धन यांनी अपराध मीच केला, आनंद (बाबू मोशाय), अरण्यक (धृतराष्ट्र), एकच प्याला (सुधाकर), कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान), कोंडी (मेयर) कौंतेय, जबरदस्त (पोलीस कमिशनर), तुघलक (बर्नी), तुझे आहे तुजपाशी (काकाजी), तुफानाला घर हवंय (आप्पासाहेब, बापू), पूर्ण सत्य, प्रपंच करावा नेटका, प्रेमकहाणी (मुकुंदा), बेकेट (बेकेट), भाऊबंदकी, मला काही सांगायचंय (बाप्पाजी), मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस), विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर), विषवृक्षाची छाया (गुरुनाथ), वीज म्हणाली धरतीला, शापित (रिटायर्ड कर्नल), शिवपुत्र संभाजी (औरंगजेब), सहा रंगांचे धनुष्य (शेख), सुंदर मी होणार (महाराज), स्वगत (एकपात्री प्रयोग, जयप्रकाश नारायण), हृदयस्वामिनी (मुकुंद) यांसारख्या अनेक नाटकांतून भूमिका साकारल्या. त्यांनी एकच प्याला, तुफानाला घर हवंय या नाटकांची निर्मितीही केली होती.
रवी पटवर्धन यांनी केवळ चित्रपट नव्हे तर अनेक नाटकांमधून अभिनयही केला. खरे तर रवी पटवर्धन हे पहिल्यांदा नाट्य अभिनेते होते. त्यानंतर ते चित्रपट अभिनेते झाले. अनेक चित्रपटांतून त्यांनी गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी प्रवृत्तीच्या भूमिका साकारल्या. काही चित्रपटांमध्ये त्यांनी वडील किंवा भाऊ अशाही भूमिका साकारल्या. त्यांनी जवळपास १५० पेक्षा अधिक नाटकं आणि जवळपास २०० चित्रपटांतून भूमिका साकारल्या होत्या.
“माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांवर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तरीही मी ठाम उभा आहे. मृत्यू अटळ आहे, पण औषधं, तपासण्या, व्यायाम, संतुलित आहार, आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर मी मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे. माझा देव, नियती आणि केलेल्या सत्कर्मावर विश्वास आहे पेराल ते उगवते यावर माझा पूर्ण विश्वास आहे.” वयोमानानुसार शारिरीक मर्यादा आल्या, पण तरी रवी पटवर्धन यांनी हार मानली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते सकारात्मक विचार ठेवून मृत्यूला झुंज देत होते. सध्या सुरु असलेल्या झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई मालिकेतील त्यांच्या आजोबांच्या व्यक्तिरेखेला नक्कीच सर्व मिस करतील. विशेषतः त्यांची सोहमला एकदम करारी मारलेली हाक “ए कोंबडीच्या सोहम” कायम लक्षात राहील.