भरणेपासून खेड-दापोली मार्गावरील योगिता दंत महाविद्यालयापर्यंत पहिल्या टप्प्यात राज्य महामार्गाचे काम करण्यात येणार आहे. भरणे येथून प्रत्यक्षात राज्य महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. शहरातील खांबतळे, तीनबत्तीनाका, कन्याशाळा ते तीनबत्तीनाका येथील राज्य महामार्गाच्या कामादरम्यान पर्यायी वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आणण्यासाठी बायपासची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी पुढाकार घेतला आहे. या बायपासच्या मार्गातील जागामालकांशीही बुधवारी रीतसर चर्चा केली. यामुळे वाहतूक व्यवस्थेतील अडथळा दूर होणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने भरणे ते दापोलीपर्यंतच्या राज्य महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
दापोलीपासून राज्य महामार्गाच्या कामास प्रारंभ होऊन अनेक ठिकाणची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. या मार्गाच्या कामासाठी एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार नाही, याकडे संबंधित ठेकेदाराकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मंगळवारी भरणे येथे असलेल्या आठवडा बाजारामुळे बऱ्याचवेळा वाहतूक कोंडी होते. आठवडा बाजारामुळे वाहने मार्गस्थ करताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. या मार्गाच्या कामामुळे तालुका कृषी रोपवाटिकेकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे.

