24 एप्रिल 1815 साली ईस्ट इंडिया कंपनीने, भारतीय लष्करातील अतिशय धाडसी आणि बहादुर समजल्या जाणाऱ्या गोरखा रेजिमेन्टची स्थापना आजच्याच दिवशी केली होती. भारतीय लष्कराचा एक महत्वाचा भाग असलेली ही गोरखा रेजिमेन्ट आपल्या बहाद्दुरी आणि सहसाबद्दल जगप्रसिद्ध आहे. गोरखा रेजिमेंट म्हणजे बलिदानाचे दुसर नाव मानलं जाते. केवळ नेपाळ आणि भारतीय लष्करातच नव्हे तर ब्रिटीश लष्करामध्ये सुद्धा गोरखा ब्रिगेड जगभरात बहादुरीसाठी प्रसिद्ध असून, अशा रेजिमेंट आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अनेक राष्ट्रांनी स्थापित केल्या आहेत.
गोरखा समुदायाचे जवान हे हिमालयातील पर्वतीय भागामधून आलेले बहुधा नेपाळ आणि आजूबाजूच्या टेकडी परिसरातील असतात. साधारणपणे त्यांना नेपाळी समजले जाते. त्यांचा उल्लेख बर्याचदा बहादुर या नावाने देखील केला जातो. फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ हे एकदा म्हणाले होते की, जर कोणी म्हणत असेल की मला मृत्यूची भीती वाटत नाही तर एक तो खोटं बोलत असेल किंवा एक तर तो गोरखा असेल. याच रेजिमेंटच्या भरवश्यावर इंग्रजांनी हिटलर बरोबर युद्ध करायला तयार झालेले. परंतु, हिटलर सुद्धा या रेजीमेंटवर एवढा प्रभावित झाला कि, त्याने सुद्धा जग जिंकण्यासाठी या रेजिमेंटचे सहाय्य घेण्याचे ठरविले.
नेपाळच्या राजेशाही विरोधात ईस्ट इंडिया कंपनीने 1815 साली युद्धाला आरंभ केला होता. या युध्दात नेपाळ पराभूत झाले असले तरी त्याच्या लष्कराने मोठा विक्रम केलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीचे सर डेव्हिड ऑक्टरलोनी या गोरखा जवानांच्या पराक्रमाने प्रभावित झाले आणि तेंव्हा त्यांनी गोरखा रेजिमेन्ट ही वेगळी बटालियनचं निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच संपूर्ण प्रयत्नाने 24 एप्रिल 1815 रोजी गोरखा रेजिमेन्टची स्थापना करण्यात आली. गोरखा रेजिमेन्टने ब्रिटीशांना शिख युध्दांत आणि अफगाण युध्दात मोठं यश मिळवून दिल होत. १९४७ सालानंतर भारत, नेपाळ आणि ब्रिटन काही गोष्टीत करारबद्ध झाले, त्यामुळे भारतीय लष्कराचा या सहा गोरखा रेजिमेन्ट हिस्सा बनल्या. कालांतराने नंतरच्या काळातसुद्धा आणखी एक गोरखा रेजिमेन्ट तयार करण्यात आली. सध्या भारतीय लष्कराच्या सेवेत या सात रेजिमेन्टच्या 39 बटालियन आहेत. कुक्री हा चाकू गोरखा रेजिमेन्टची ओळख आहे आणि असे म्हटले जाते कि, त्यांनी जर कुक्री म्यानातून बाहेर काढली तर, शत्रूचे रक्त त्याला लावत नाही तोपर्यंत ती पुन्हा म्यानात ठेवत नाहीत. भारतीय लष्करामधील गोरखा रेजिमेन्ट हे अतिशय महत्वपूर्ण आणि साहसी अंग आहे. या रेजिमेन्टला खासकरून पर्वतीय लढाईमध्ये महत्वाचे मानले जाते.