भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कायमच्या तणावग्रस्त संबंधांमुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतामध्ये खेळण्यासाठी येण्यावर केंद्र सरकार व्हिसाची परवानगी देणार का? असा प्रश्न आयसीसीला पडला होता. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, बीसीसीआयनं शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीनंतर पाकिस्तानी खेळाडू आणि मीडियाला व्हिसा देण्यासाठी भारत सरकार तयारी दर्शविली असल्याची माहिती आयसीसीला दिली आहे.
त्यामुळे आता आगामी टी-20 वर्ल्ड कप 2021 साठी भारतामध्ये येण्याचा पाकिस्तानच्या खेळाडूंचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सामन्यांसाठी पाकिस्तानच्या चाहत्यांना भारतामध्ये एन्ट्री देण्यात येणार कि नाही याबाबतीत सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. टी-20 वर्ल्ड कप ही एक जागतिक स्पर्धा असल्याने, पाकिस्तानचे खेळाडू आणि मीडियाला भारतामध्ये खेळासाठी येण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. या विषयावर आगामी काळात चर्चा होणार असून, त्यापूर्वी बीसीसीआयला या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी 31 मार्चपर्यंत अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर या विषयावर एक महिन्याच्या आत काहीतरी निर्णय घेण्याचे आश्वासन बीसीसीआयनं 1 एप्रिल रोजी बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात झालेल्या मिटिंगमध्ये दिलेलं.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट टीममध्ये कोणताही क्रिकेटचा सामना खेळला गेला नाही आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायम तणावग्रस्त परिस्थिती आणि काही राजकीय मुद्द्यांमुळं उठलेले वादंग या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी तेढ कायम ठेवून आहे. ऑक्टोबर महिन्यात भारतात खेळण्यासाठी तयार असणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या वाटेतील अडचणी दूर झाल्या आहेत. कारण, भारत सरकारकडून या खेळाडूंना व्हिसाची परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या व्हिसाचा प्रश्न तर सुटला आहे पण, अद्याप पाक चाहते क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी सीमा ओलांडून यायला परवानगी मिळणार आहे का, याबद्दल मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती बीसीसीआयशी संलग्न सूत्रांनी दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान मधील असणारी कायमची तेढ कदाचित या खेळांमुळे कमी होईल असे वक्तव्य शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी केले होते. येत्या काळात ही परिस्थिती बदलण्याची चिन्हं दिसून येत आहेत. तसेच बीसीसीआयनं टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी एकूण नऊ ठिकाणांची पाहणी करून ठेवली असून, याचा अंतिम सामना अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार असून, इतर सामन्यांसाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद कोलकाता आणि धरमशाला या ठिकाणी असणाऱ्या स्टेडियमचा विचार करण्यात आला आहे.