ज्याप्रमाणे महिला दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक पुरुष दिवसाची संकल्पना ही ‘मेकिंग अ डिफरन्स फॉर मेन अँड बॉयज’ ही आहे. तर हा दिवस का साजरा केला जातो याबद्दल थोडे जाणून घेऊया. भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. परंतु पुरुषांच्या असणाऱ्या विविध समस्यांवर कधी चर्चाच केली जात नाही. त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या असतात, जसे कि, त्यांच्या आरोग्य विषयक समस्या, पुरुषांसोबत होणारा भेदभाव, त्यांना व्यसन अथवा आत्म्हत्येपासून परावृत्त करण्यासाठी १९ नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. समाजात फक्त महिलांवरच अत्याचार होतो असे नाही आहे. आपल्या आजूबाजूला बघितले तर बर्याच प्रमाणात पीडित पुरुषही दिसतील. असमानता, हिंसा, शोषण, पक्षपात याचा त्रास पुरुषांनाही होतो. पुरुषांचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजात दिला गेलेला सन्मान , लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालामध्ये बेरोजगारी वाढली की पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढते आहे, असे स्पष्ट केले आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर काम करणारी ही संस्था आहे. जगभरातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. १९९९ मध्ये पहिला पुरुष दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर भारतात तब्बल आठ वर्षांनी म्हणजेच १९ नोव्हेंबर २००७ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला होता. पुरुष आणि मुलांचे उत्तम आरोग्य ही यंदाच्या पुरुष दिनाची थीम आहे. विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भारता मध्ये आता कुठे या दिवसाला प्रसिद्धी मिळाली आहे. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे. घरातील पुरुषांना ते आपल्या आयुष्यात किती खास आहेत याची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. त्या दिवशी त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवा, त्यांना एखादे त्यांच्या आवडीच सरप्राइज भेटवस्तू अथवा एखादे पुस्तक वाचण्यासाठी भेट द्या किंवा या विशेष दिनाबद्दल छान स्वरचित मेसेज असलेलं शुभेच्छा कार्ड देऊनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता. कितीही कोणतेही दिवस साजरे केले तरी स्त्री आणि पुरुष हे एकमेकांच्या विविध रूपातील साथीनेच परिपूर्ण होतात.