हरिद्वार येथे कुंभमेळ्यातील गर्दी आणि रोजचे वाढणारे कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता या कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाडा परिषदेकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून याबाबतीत चर्चा केली आहे. तसेच त्यांनी आता पर्यंत संतांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभारही मानले आहेत. 1 एप्रील ते 30 एप्रिल पर्यंत कालावधीमध्ये अद्याप दोन शाही स्नान झाली असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवून त्याची सांगता करावी अशी विनंती मोदिनी केली आहे. त्यामुळे कोरोना विरोधातल्या शासनाच्या लढ्याला हातभार लागेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यातही दररोज साधारण 1000 च्या आसपास कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद केली जात आहे. कुंभमेळ्यात होणार्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसत असून अनेक आखाड्यांच्या जेष्ठ साधू- संतांना संसर्गीत झाले आहेत. त्यामुळे एकूण 13 आखाडयांपैकी या दोन आखाडयांनी निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा 17 एप्रिलला कुंभ समाप्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी फोनवरुन चर्चा करून सर्व संतांच्या आरोग्या बाबत माहिती जाणून घेतली, व शासन करत असलेल्या कोरोना विरुद्धची लढाईमध्ये एकत्र लढल्याने ताकद मिळेल. सर्व साधू संतांनी एकत्रित येऊन सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
30 एप्रिलला तिसरं शाहीस्नान होणार आहे. परंतू, कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेऊन मोदींच्या आवाहनाला मन देऊन दोन आखाड्यांनी त्याआधीच कुंभसमाप्तीची घोषणा केली आहे. परंतु, सध्या या आखाड्यांचा निर्णय हा केवळ त्यांच्या पुरता मर्यादित आहे. कारण एकूण 13 आखाड्यांची एकत्रित संस्था असलेली आखाडा परिषद याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. पण या दोन आखाड्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे इतरही पाच सहा आखाडे कुंभसमाप्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी महाराज हे शाहीस्नाना आधीच कोरोना पॉझिटिव्ह आले होते, त्यांच्यावर सध्या हृषिकेशच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत तर दुसरीकडे काल निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन झाल्याच वृत्त आहे.
आता चक्क पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर कुंभ मेळ्यातील आखाडा परिषद काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. अख्खा देश कोरोनाच्या विळख्यात असताना, कुंभमेळ्यातल्या लाखो लोकांच्या होणार्या गर्दींने शासन हवालदिल झाले आहे. पण शेवटी कुंभमेळ्यातल्या दोन आखाड्यांनी तरी परिस्थितीचं भान राखत कुंभ समाप्तीचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.