Homekhedएक दिशा मार्गाची 'दिशा' हरपली ! खेड शहरातील मध्यवर्ती भागातील स्थिती

एक दिशा मार्गाची ‘दिशा’ हरपली ! खेड शहरातील मध्यवर्ती भागातील स्थिती

अरुंद रस्ते व पार्किंगच्या अभावामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनार आळी येथील सिद्धिविनायक मंदिर या मुख्य व्यावसायिक पट्ट्यामध्ये ‘एकेरी मार्ग’ प्रभावीपणे अमलात आणणे ही खेडवासीयांची मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणे, अरुंद रस्ते व पार्किंगच्या अभावामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबई-गोवा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या खेड शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्यांचे वास्तव्य वाढलेले असून, वाहनांचा राबताही अधिक आहे. परिणामी, वाहतुकीचे नियोजन ही काळाची गरज बनलेली आहे. खेड शहरात वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्रस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनार आळी येथील सिद्धिविनायक मंदिर या मार्गावर ग्राहकांची वर्दळ, व्यापाऱ्यांची व्यावसायिक दैनंदिनी आणि रहिवाशांची नियमित ये-जा सुरू असते. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते, रिक्षा, चारचाकी, मोठी वाहने, मालवाहू गाड्या आणि दुचाकी यांची वाहतूक एकाच अरुंद मार्गावरून होत असते.

दोन्ही बाजूंनी वाहने समोरासमोर आली की वाहतूक कोंडी होते आणि वाहने तासनतास अडकून पडतात. त्यामधून मार्गक्रमण करणे अत्यंत त्रासदायक ठरते. या मार्गावर अतिक्रमणे, अनधिकृत हातगाड्या, रस्त्यावर बसलेले विक्रेते, तसेच पार्किंगच्या सुविधेचा अभाव या समस्याही आवासून उभ्या आहेत. याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. या मार्गावर शहरातील महत्त्वाचे चौक, बसस्थानक परिसर, पेठ बाजारपेठ, गांधी चौक, तीनबत्ती नाका आणि सोनार आळी असा सर्वाधिक वर्दळीचा भाग येतो. मात्र, अंमलबजावणीचा प्रश्न गेल्या दोन दशकांपासून आजही प्रलंबितच आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन दशकांचे प्रयत्न व्यर्थ – खेड नगरपालिकेने यापूर्वी अनेकदा एकदिशा मार्गाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यापारी संघटना, पोलिस प्रशासन व नगरपालिका यांची संयुक्त बैठकही झाली. नो-एन्ट्री, दिशादर्शक, वाहतूक नियोजन अशा निर्णयांवर सर्वानुमते ठराव करण्यात आला. काहीवेळा प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीही झाली, परंतु त्यात सातत्य राहिले नाही. त्यामुळे दोन दशकांपासून हा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. अंमलबजावणीत सातत्य नसल्याने, व्यापाऱ्यांचा विरोध, अतिक्रमणकर्त्यांचा आडमुठेपणा यामुळे योजना कोलमडून पडली.

अतिक्रमणांचा वाढता विळखा – वन-वे मार्गावरच रस्त्याच्या शेजारी भाजी विक्रेते, हातगाड्या आणि फेरीवाले यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी निम्म्याने कमी झाली आहे. दिवसाची सुरुवात होताच चौक, फूटपाथ आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत बस्तान मांडले जाते. यामुळे पादचारी धोक्यात येतात आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते.

पार्किंगचा अभाव – खेड शहरात एकही शासकीय किंवा व्यवस्थापित पार्किंग सुविधा नाही. परिणामी, गांधी चौक, पेठ बाजारपेठ, बसस्थानक परिसर या भागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. वन-वे रस्ता असूनही दुचाकींच्या बेकायदेशीर रांगांमुळे मार्ग सतत अडथळलेला राहतो. वाहतूक पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता आणि नगरपालिकेची उदासीन भूमिका यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.

हे करावे लागेल – शहर अतिक्रमणमुक्त मोहीम राबवणे. स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे. वाहतूक पोलिसांची गस्त वाढवणे. व्यापाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळवणे. उपाययोजनांची प्रशासनाकडून प्रभावी अंमलब-जावणी.

खेड शहराच्या विस्तारानुसार वाहतूक नियोजनाची गरज – वन-वेच्या प्रभावी अंमलबजावणीने वाहतूक कोंडी ४० ते ५० टक्के कमी होऊ शकते. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होईल.
व्यावसायिक क्षेत्रात गती येईल. बसस्थानक परिसरातील गर्दीत घट होईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments