सोशल मीडिया स्टार, लोकप्रिय यूट्यूबर आणि अभिनेता अशी ओळख निर्माण केलेल्या राहुल वोहरांचं कोरोनामुळे दिल्लीमध्ये निधन झालं आहे. 35 वर्षीय राहुल वोहरा यांचा दिल्लीतील द्वारका येथील आयुष्मान हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू ओढावला. दिल्लीच्या ताहिरपूर येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये राहुल वोहरा गेले ८ दिवस भर्ती होते. मात्र तिथल्या उपचारांवर ते खुश नव्हते. अशातचं त्यांची तब्येत अजून खालावत चालल्याने त्यांनी चांगल्या दवाखान्यात भर्ती करण्याविषयी पोस्ट लिहिली होती. विशेष म्हणजे फेसबुकवर त्यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांनी एक पोस्ट लिहीली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी कदाचित मी वाचू शकलो असतो, मी लवकरच पुन्हा जन्म घेईन आणि चांगले काम करेन. परंतु, माझ्यातील धैर्य आता संपत आले आहे, आपलाच Irahul Vohra, अशी पोस्ट राहुलने मृत्युपूर्वी एक दिवस आधी केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी हॉस्पिटलच्या असणार्या गलथान कारभाराबद्दल सर्व डिटेल्स पुरविल्या आहेत. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही त्या पोस्टमध्ये टॅग केलं होतं.
रविवारी दुपारी राहुल वोहरा यांच्यावर अंत्यसंस्कार करुन आलेल्या अस्मिता थिएटर ग्रुपचे प्रमुख आणि दिग्दर्शक अरविंद गौर यांनी राहुल यांच्या अचानक एक्झिट वर बोलताना सांगितल कि, राहुलला शनिवारी आम्ही राजीव गांधी हॉस्पिटलमधून, चांगल्या उपचार सुविधा असलेल्या आयुष्मान हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु दुर्देवाने आम्ही त्याचे प्राण वाचवू शकलो नाही. त्यांनी पुढे सांगितलं की, कोरोनामुळं राहुलच्या लंग्समध्ये खूप जास्त प्रमाणात इन्फेक्शन झालं होतं. राहुल हा प्रतिभावान कलाकार आणि चांगला गुणी विद्यार्थी असल्याचे अरविंद यांनी सांगितलं. फेमस यूट्यूबर होण्याआधी 2006 ते 2011 दरम्यान राहुल यांचे अरविंद गौर यांच्याशी थिएटर ग्रुपच्या माध्यमातून चांगले संबंध जुळले होते. त्यांच्या सोबत अनेक नाटकांमध्ये राहुल यांनी काम केलं होतं. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या त्यांच्या अनफ्रीडम चित्रपटामध्येही राहुलनी काम केलं होतं.
राहुलची पत्नी ज्योती हिने केवळ रुग्णालयाच्या निष्काळजीपणा मुळे राहुलचा मृत्यू ओढावला आहे, असा आरोप लावला आहे. राहुलच्या अखेरच्या दिवसांचा एक व्हिडिओ ज्योतीने शेअर करत त्यामध्ये लिहिले आहे कि, प्रत्येक राहुलला न्याय हा मिळायलाचं हवा. माझा राहुल गेला आहे, हे सर्वांना माहित असून, तो कसा गेला हे अद्याप कोणालाही माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ताहिरपूर दिल्ली इथे अशाचं प्रकारे उपचार केले जातात का ! असा प्रश्न ज्योतीने उपस्थित करत रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आणला आहे. सोबतच आशा करते कि, मृत्यूनंतर तरी माझ्या नव-याला योग्य न्याय मिळेल. आणखी एका राहुलचा जगातून बळी जायला नको, असे ज्योती म्हणाली आहे.