देशामध्ये कोरोना महामारीच्या संकटाने भयानक रूप धारण केलं असून रोजच्या वाढणाऱ्या रुग्ण संख्या आता लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकजण विविध मार्गाने कोरोना संक्रमितांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. यामध्ये सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी पुढे सरसावले असून त्या यादीत आत्ता विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचेही नाव सामिल झाले आहे. या दोघांनी मिळून कोरोनाबाधितांसाठी मदत म्हणून दोन कोटी रुपये तसेच कोरोनाबाधितांना मदत म्हणून एक फंड सुद्धा उभारायला सुरुवात केली आहे. Ketto नावाच्या प्लॅटफॉर्मवर #InThisTogether या नावाने एक फंड उभारायला सुरु केलं आहे. या फंडच्या माध्यमातून विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सात कोटी रुपये जमा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.
तसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्माने यासंदर्भातील एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये #InThisTogether या नावाने हे फंड गोळा करण्याचे अभियान पुढील सात दिवस चालणार आहे. या फंड रेझिंग अभियानाच्या माध्यमातून जी काही रक्कम जमा होइल, ती ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या एका ACT ग्रांट्स नावाच्या एका संस्थेला देण्यात येणार आहे. जेणेकरून या फंड अभियानाच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होऊन, इतर अनेक प्रकारच्या कोविड निर्बंधित साहित्याचा पुरवठा होण्यास मदत होईल.
आपला देश एका मोठ्या महामारीमध्ये वेढला गेला असून, अशावेळी या सर्वातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी देश सर्वतर्हेने झटत असून, अशावेळी आपण एकत्र येऊन लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत. त्यामुळे या फंड रेझिंग अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन विराट कोहलीने केलं आहे. तर या फंडच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना लढण्यास मदत मिळेल अशी आशा अनुष्का शर्माने केली आहे.
सोशल मीडिया अकाउंटवर अनुष्काने विराट सोबतचा एक व्हिडीओ शेअर करून, त्या व्हिडीयोमध्ये तिने म्हटले आहे कि, आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेवर खूप मोठ्या प्रमाणात तणाव असून, रोज विविध आव्हानांचा सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशातील लोकांच्या समस्या पाहून मला खूप दु:ख झाले, त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी आणि विराटने #InThisTogether हे अभियान मोहिम सुरु केले आहे.
अनुष्का आणि विराट यांनी किट्टो या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या सहयोगाने ही मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. पुढील सात दिवस ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यातून जमा झालेला निधी ACT ग्रांट्सकडे सोपवला जाणार आहे, हा निधीचा वापर गरजूंसाठी ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, सोयी सुविधा आणि लसीकरण वेगवान होण्यासाठी तसेच अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या संख्येनुसार, गेल्या 24 तासांमध्ये भारतात 4,14,188 नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली असून 3,915 रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. तसेच यातून सकारात्मक बातमी म्हणजे 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर यशस्वीपणे मात करुन घरी परतले आहेत.